नरेंद्र मोदी यांच्याच हातात देश सुरक्षित 

रावसाहेब दानवे ः भाजप-शिवसेना महायुतीचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा

सोलापू – आज देशामध्ये भयानक युद्धजन्य परिस्थिती आहे. केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात आता देश सुरक्षित राहू शकतो, अशी तमाम देशवासीयांची भावना आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि मोदींचे हात बळकट करा असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.

सोमवारी हेरिटेज येथे महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष दानवे बोलत होते. दानवे म्हणाले, राज्यात युती अभेद्य आहे ती कोणीसुद्धा मोडू शकणार नाही हे कोल्हापुरातील विराट महामेळाव्याने दाखवून दिले आहे. करवीर नगरीच्या महालक्ष्मीने आशीर्वाद दिला आहे. महालक्ष्मीच्या साक्षीने राज्यात महायुतीच्या सर्व उमेदवार निवडून येऊन देशात पुन्हा युतीची सत्ता येऊन पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होतील.

अतिरेक्‍यांनी सैनिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र पंतप्रधान मोदी यांनी संयमाने सर्व परिस्थिती हाताळत करार जवाब दिला आहे. 40 सैनिकांच्या बदल्यात 300 अतिरेक्‍यांचा खात्मा केला. हे फक्त मोदीच करू शकले. त्यामुळे मोदींच्या हातीच देश सुरक्षित राहणार आहे, अशी भावना देशवासियांमध्ये आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

भाजप-शिवसेना जातीयवादी असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जातो. शरद पवार, मायावती, फारुख अब्दुल्ला यांना जातीवादी असल्याचा आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्या-ज्या वेळी यांना भाजप-सेनेची मदत लागली त्यावेळी त्यांनी आमची मदत घेतली. आमच्या पंगतीला बसून जेवले. आता मात्र जातीवादाचा आरोप करत आहेत. त्यांची तोंडे आमच्या पंगतीला जेऊन खरकटी झाली आहेत. त्यामुळे त्यांना असे आरोप करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा टोलासुद्धा दानवे यांनी लगावला. या मेळाव्याला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, शिवसेनेच्या प्रवक्‍त्या नीलम गो-हे यांच्यासह भाजप-शिवसेना युतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रसेवेसाठी राजकारणात

दोन हात एकमेकांच्या हातात आले कि शक्ती प्राप्त होते. शिवसेनेने भाजपाला हातदिला आहे. त्यामुळे आता एकीचा विजय नक्की आहे. मी आतापर्यंत समाजसेवा केली. आपल्या विश्वासावर राष्ट्रसेवा करण्यासाठी राजकारणात उतरत आहे. न बोलता फक्त काम करणे हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे मोदींचे हात बळकट करण्यासाठी मला विजयी करण्यासाठी कामाला लागण्याचा सल्ला भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी यावेळी दिला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)