ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आता मतदारांच्या उजव्या हाताच्या तर्जनीला शाई

कोल्हापूर : राज्यात दिनांक 11 एप्रिल ते 29 एप्रिल 2019 या कालावधीत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे मतदान लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने 24 मार्च रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ग्रामपंचायती) निवडणुकांसाठी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्याचे आदेश निर्गमीत केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला पक्क्या शाईने निशाणी केली जाते; तसेच पुनर्मतदानाच्यावेळी डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या स्थायी सूचना आहेत. मात्र भारत निवडणूक आयोगाने 10 मार्च 2019 रोजी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यात 11, 18, 23 ते 29 एप्रिल 2019 अशा चार टप्प्यांत मतदान होणार आहे. लोकसभा आणि संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी साधारणत: एकाच वेळी मतदान होत असल्याने शाईच्या निशाणीबाबत संभ्रम निर्माण होऊ नये, याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाई न लावता आता उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील एकूण जागा व मतदारांची संख्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा अत्यंत कमी असल्यामुळे हा बदल केल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही, असे राज्य निवडणुक आयुक्त यांनी स्पष्ट केले.

24 मार्च 2019 रोजी मतदान होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायतीं व पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या 8 रिक्त जागासाठी पोटनिवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत आता डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)