पहिल्याच पावसात चेंबरला “उकळी’; वाहतूकही तुंबली

नालेसफाईचा पालिकेचा दावा फोल

पुणे – शहरात नाले, पावसाळी वाहिन्या तसेच ड्रेनेज सफाईचा दावा केल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. मात्र, मान्सूनच्या पहिल्याच पावसात महापालिकेचा हा दावा वाहून गेला असून शहरातील रस्त्यांना तळ्यांचे स्वरूप आले होते. तर, अनेक ठिकाणी पावसाळी नाल्यांची झाकणे हवेत उडून त्यातून उकळी आल्यासारखे पाण्याचे फवारे येत होते. त्यामुळे ही नाले सफाई आणि पावसाळापूर्व कामे नक्की झाली का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

गेल्या महिनाभरापासून पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत होते. त्यात, प्रामुख्याने पाणी वाहून जाण्यासाठीचे नाले तसेच ड्रेनेज चेंबरची सफाई करण्यात आली होती. त्यातील घाण तसेच कचरा काढण्यासाठी महापालिकेने गेल्या पंधरा दिवसांत युद्धपातळीवर यंत्रणा लावत लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता.

त्यामुळे पावसाळ्यात गटारे तुंबणार नाहीत, तसेच पाणीही साठणार नाही असा दावा करण्यात येत होता. त्यातच, या वर्षी मान्सूनपूर्व तसेच वळवाचा पाऊसही झाला नाही. त्यामुळे महापालिकेने केलेल्या या नालेसफाईच्या कामांची तपासणी होऊ शकली नाही.

मात्र, सोमवारी दुपारनंतर मान्सूनने पुण्यात चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसले. पावसाळी जलवाहिन्यांतून तसेच ड्रेनेजमधून हे पाणी जाऊच न शकल्याने शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेजच्या चेंबरमधून उकळी आल्यासारखे पाणी वाहत होते.

त्यातच या पाण्याला जाण्यासाठी वाटच नसल्याने शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर तसेच चौकात दोन फुटांपर्यत पाणी साचल्याने अनेक रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तर पाणी निचरा करण्यासाठी महापालिकेची कोणतीही यंत्रणा रस्त्यावर उतरली नाही. त्यामुळे सायंकाळच्या सुमारस कार्यालयीन वेळ संपल्यानंतर बाहेर पडलेल्या नागरिकांना या वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लगला.

पदपथ रचना, सिमेंट रस्त्यांचा फटका
महापालिकेकडून शहरातील बहुतांश रस्त्यांवर नव्याने पदपथ विकसित करण्यात आले असून मुख्य रस्त्यापासून अर्धा फुटांपेक्षा अधिक उंचीवर हे पदपथ आहेत. त्याच वेळी पदपथांच्या बाजूला महापालिकेने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी चेंबर बसविली आहेत. मात्र, त्या चेंबरमधून पाणी जाण्यासाठी असलेल्या छिद्रांमध्ये राडारोडा, माती आणि कचरा अडकल्याने हे पावसाचे पाणी जलवाहिनीत न जाताच रस्त्यावरच साचून राहात होते. तर दुसऱ्या बाजूला सिमेंटचे रस्ते असल्याने या पाण्याला जमिनीत मुरण्यासाठी जागाच नसल्याने हे पाणी एकाच जागेवर साठून राहत होते. त्यामुळे शहरात ज्या ज्या भागात सिमेंटचे रस्ते आहेत, त्या ठिकाणी रस्त्याला अक्षरश: नदीचे स्वरूप आले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)