जिल्ह्यामध्ये “भटक्‍या कुत्र्यांची’ दहशत

वेळीच बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
पुणे – जिल्ह्यात भटक्‍या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी किंवा मनुष्यवस्ती कमी असलेल्या भागांत दरवर्षी या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये हजारो नागरिक जखमी होत आहेत. यावर्षी मे 2018 अखेर 14 हजार 129 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये “भटक्‍या कुत्र्यांची’ दहशत पसरली असून, त्यांचा वेळीच बंदोबस्त लावण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ग्रामीण भागांत गावाच्या मुख्य ठिकाणासह काही अंतरावर वाड्या-वस्त्या असतात. शेतकऱ्यांचा मित्र आणि घराची राखण करणारा मित्र म्हणजे “कुत्रा’ (श्‍वान) असतो. परंतु, गावांमध्ये पाळीव कुत्र्यांपेक्षा भटक्‍या कुत्र्यांची संख्या अधिक असते आणि हे सर्व श्‍वान गावांतील रस्त्यांवर दबा धरून बसलेले असतात. त्यामुळे रात्रीच्यावेळी समोर कुत्रा दिसल्यावर पुढे जाणारा नागरिकही “पुढे जायचे की नाही’ या भीतीने घामाघूम होतो आणि आल्या पावली माघारी फिरावे लागते.

-Ads-

एवढी दहशत या कुत्र्यांची असते. या दहशतीला गावांतील नागरिकांपेक्षा बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीना मोठ्या धाडसाने सामोरे जावे लागते. गाव किंवा वाड्या-वस्त्यांवर जाताना अनोळखी व्यक्तीच्या मनात एकच भीती असते, ती म्हणजे कुत्र्यांची. कोण, कधी, कोठून कसे येतील आणि हल्ला करतील याची शाश्‍वती नसते. त्यामुळे गावांत किंवा एखाद्याच्या वाड्यामध्ये प्रवेश करताना “दबकतच’ प्रवेश करावा लागतो. या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
जिल्ह्यात मागील वर्षभरात (2017) 20 हजार 400 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.

त्यामध्ये सर्वाधिक घटना या हवेली तालुक्‍यात घडल्या असून, 3 हजार 945 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. जुन्नर तालुक्‍यात 3 हजार 561 व्यक्ती कुत्र्यांच्या हल्ल्यात सापडले असून, त्यापाठोपाठ दौंड येथे 2 हजार 774, इंदापूर येथे 2 हजार 145 आणि मावळ येथे 2 हजार 97 व्यक्तींचा समावेश आहे. तसेच, मे 2018 पर्यंत अवघ्या पाच महिन्यात 14 हजार 129 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली. त्यामध्ये यावर्षीही हवेली तालुक्‍यात सर्वाधिक 3 हजार 174 व्यक्ती कुत्र्यांच्या हल्ल्यात सापडले आहेत. त्यापाठोपाठ जुन्नर येथे 1 हजार 944, इंदापूर 1 हजार 408, दौंड 1 हजार 446 व्यक्तींचा समावेश आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)