जिल्ह्यात आघाडी-युतीत “टाय’

पुणे – पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक लक्षवेधी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात युती आणि आघाडीसाठी “थोडी खुशी, थोडा गम’ अशी स्थिती आहे. जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारासंघ ताब्यात ठेवण्यासह राष्ट्रवादीने शिरूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांची 15 वर्षांच्या सलग खासदारकीच्या कारकिर्दीला ब्रेक लावत, ही जागा जिंकली आहे. तर पुणे लोकसभा मतदारसंघ पुन्हा भाजपने जिंकला असून मावळ लोकसभा मतदारसंघात बारणे यांनी आपला मतदारसंघ राखण्यात यश मिळविले आले.

पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा निवडणुकांसाठी आघाडीतील राष्ट्रवादीने तीन; तर कॉंग्रेसला पुण्याची एक जागा देण्यात आली होती. तर भाजपने दोन आणि शिवसेनेने दोन जागा लढविल्या होत्या. त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले होते. शिरूरमध्येही राष्ट्रवादीकडून डॉ. अमोल कोल्हेच्या नावाने नवीन चेहरा देण्यात आला होता. त्याचवेळी शिवसेनेने या दोन्ही मतदारसंघांत आपल्या विद्यमान खासदारांना संधी दिली होती. तर पुण्यातून कॉंग्रेसकडून ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांना संधी देण्यात आली. तर भाजपकडून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचे तिकीट कापत पालकमंत्री गिरीश बापट यांना संधी देण्यात आली होती. तर भाजपकडून राष्ट्रवादीचे सत्ताकेंद्र असलेली बारामतीची जागा काबीज करण्यासाठी पवारांविरोधात तिसऱ्यांदा राजकीय बंड करणाऱ्या कुल घराण्यातील आमदार राहूल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना संधी दिली होती. तसेच, कुल यांच्या प्रचारासाठी भाजपने राज्यातील दिग्गज नेत्यांची फौज उतरविली होती.

त्यामुळे जिल्ह्यातील निकालांकडे सर्वच राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते. कुल यांच्यासाठी थेट राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील बारामतीमध्ये तळ ठोकून असल्याने बारामतीची जागा राष्ट्रवादीला जड जाण्याची भीती व्यक्‍त केली जात होती. तर त्याचवेळी पुण्यात एकतर्फी निवडणूक होणार असल्याचे सांगत पुण्याकडे फारसे लक्ष देण्यात आलेले नव्हते. त्याचवेळी मावळची जागा राष्ट्रवादीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार हे बारणे यांच्याविरोधात असल्याने राष्ट्रवादीकडून राज्यातील नेत्यांसह पुण्यातही नगरसेवकांची फौज मावळात उतरविण्यात आली होती. तर मावळात शेकापकडूनही राष्ट्रवादीला पाठींबा देण्यात आला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)