रंगांच्या उधळणीत रंगपंचमी उत्साहात

सातारा – रंगांची उधळण करत साताऱ्यात रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सकाळपासूनच शहरात वातावरण रंगीत झाले होते. असे असताना माध्यमिक व उच्चमाध्यमिक शांलात प्रमाणपत्र परीक्षा संपल्याने रंगोत्सवाला जरा जास्तच उल्हास होता. निवडणुकीच्या प्रचाराचा रंग फिका पडावा इतके रंग शाहूनगरीने अनुभवले.

निळा, लाल, गुलाबी, भगवा असे रंग हातात घेऊन घरापासून ते शहराच्या विविध ठिकाणी रंगपंचमी खेळण्यात आली. रोज एकमेकांना बघून ओळखणारे चेहरे हे अनेक रंगांनी भरून गेले होते. लहान मुले आपल्या पिचकारीत रंग भरून एकमेकांच्या अंगावर उडवून नाचत होती. तर आपल्या आई-वडिलांना रंग लावण्यासाठी चिमुकले आतूर झाले होते.
पोवई नाका, समर्थ मंदिर चौक, शाहू चौक, सदर बझार येथे तरुणतरुणींनी घोळक्‍यानी एकमेकांना मनसोक्त रंगात भिजविले. तरुण मुले-मुली तर आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींना रंग लावण्यासाठी त्यांच्या घरी, कॉलेजवर जाऊन रंगपंचमी साजरी करत होती. तर काही भागात गाणी लावून नृत्य जल्लोष रंगला. यामुळे शहरातील संपूर्ण वातावरण हे रंगीत झाले होते.

रंगाबरोबर पार्टीसुद्धा

आजच्या काळात जेवढे महत्त्व सणाला आले आहे तेवढेच महत्त्व हे पार्टीला आले आहे. यामुळे रंगांची उधळण करून आपल्या आवडत्या ठिकाणी जाऊन जेवणांचा चांगला बेत घरातील सदस्यांनी तसेच या तरुण मुले-मुली यांनी आखलेला दिसत होता. यामुळेच सर्वच हॉटेलमध्ये गर्दी दिसत होती.

परीक्षा संपल्याने रंगपंचमीत रंगत

माध्यमिक व उचमाध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे साताऱ्यात उत्साहाला प्रचंड उधाण आले होते. साताऱ्यात रंगपंचमी आणि कराडच्या सभेतील खासदार उदयनराजेंच्या कमिटमेंटची जोरदार चर्चा होती. राष्ट्रवादीच्या पहिल्या प्रचार सभेला जोरदार प्रतिसाद मिळाल्याने उदयनराजे मित्रसमूह प्रचंड खूश होता. राजे समर्थकांनी जलमंदिर परिसरात रंगपंचमी जल्लोषात साजरी करत मंगळवारी कल्याण रिसॉर्ट येथे होणाऱ्या मेळाव्याची तयारी चालवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)