श्रीगोंद्यात कारागृहातच आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

श्रीगोंदा – येथील दुय्यम कारागृहात अटकेत असणाऱ्या गोट्या बंडू काळे (वय 24 रा. आखोनी, कर्जत) या आरोपीने आज पहाटे चारच्या सुमारास लोखंडी भांडे गळ्याभोवती मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिथे कर्तव्यावर हजर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, काष्टी येथील दरोड्यात गोट्या बंडू काळे याचा सहभाग असल्याचे निष्पन झाल्याने त्याला नंदूरबार येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आली. आज पहाटे चारच्या अगोदर आरोपी गोट्या काळे याने शौचालयात वापरले जाणाऱ्या लोखंडी भांडयाच्या सहाय्याने सुरुवातीला डाव्या हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गळ्याभोवती लोखंडी भांडयाने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार केल्यानंतर तो परत येऊन झोपला. कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी झोपलेल्या आरोपीना उठवले. त्यात गोट्या काळे यालाही उठविण्यात आले. त्याच्या शर्टला रक्त लागलेले असल्याचे लक्षात येताच त्याच्याकडे विचारपुस करण्यात आली. त्याने कारागृहात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच त्याला श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव म्हणाले, कारागृहात आरोपी गोट्या काळे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, ही घटना उडकीस येताच त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)