रियाध- सौदी अरेबियातील पूर्वेकडील कातिफ भागात पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईमध्ये 8 संशयित दहशतवादी ठार झाले आहे. ही कारवाई नव्याने कार्यरत झालेल्या कट्टर शिया पंथियांच्या गटाविरोधात करण्यात आली होती, असे सौदीच्या अधिकृत प्रसिद्धी एजन्सीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
हे संशयित दहशतवादी सेनाबीसच्या जवळच्याच एका रहिवासी अपार्टमेंटमध्ये घुसले होते. पोलिसांनी या अपार्टमेंटला वेढा घातल्यावर चकमकीला सुरुवात झाली. या चकमकीत हे आठजण मारले गेले. सौदीच्या पूर्वेकडील कातिफ प्रांतात 2011 पासून अरब स्प्रिंग या संघटनेने अशांतता पसरवायला सुरुवात केली आहे. त्यावेळी झालेल्या आंदोलनादरम्यान सुन्नीं वर्चस्व असलेल्या सरकारकडून मिळणारी भेदभावाची वागणूक संपवण्याची मागणी निदर्शकांनी केली होती. मात्र सौदीच्या सरकारने हा आरोप फेटाळला आहे.