सातऱ्यात राष्ट्रवादीचा दबावाच्या सर्जिकल स्ट्राईकशी सामना

सातारा – लोकसभेच्या जागांसाठी पुण्यात बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादीची बैठक झाल्यापासून सातारा व माढा मतदारसंघात राष्ट्रवादीला दबावाच्या सर्जिकल स्ट्राईकशी सामना करावा लागत आहे. या दोन्ही मतदारसंघात भावकीचा गृहकलह पेटला असून पवारांना फलटणमध्ये गटबाजीचा अपशकुन झाला तर उदयनराजेंच्या विरोधात आमदार शिवेंद्रराजे यांनी सुरू केलेल्या मिसळ डिप्लोमसीने दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादी भयंकर अग्निदिव्यातून जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

माढा जागेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी सूचक वक्तव्य करून नंतर स्वतःची उमेदवारी जाहीर करताच माढयात भाजपने पवार विरोधकांची मोट बांधायला सुरवात केली. माजी खासदार विजय सिंह मोहिते पाटील समर्थकांची असणारी तीव्र नाराजी, सुभाष देशमुखांनी भाजपकडून ठोकलेला शड्डू बबन शिंदे यांच्या सुरू झालेल्या राजकीय खेळ्यामुळे माढ्यात राजकारणाचा टशन पहायला मिळणार आहे. माढ्यात रासपच्या महादेव जानकरांना राजकीय फायदा देण्यासाठी धनगर आरक्षणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शरद पवारांच्या संपूर्ण कारकिर्दीत यंदाची लोकसभा ही प्रचंड अंर्तगत विरोधाची ठरली आहे. परवा फलटणमध्ये आढावा बैठकीत शेखर गोरे समर्थकांनी जो गोंधळ घातला तो विधान परिषद निवडणूकीत राष्ट्रवादीची मते जास्त असताना विरोधकांनी कॉंग्रेसच्या उमेदवारासाठी ताकत लावली ही सल व्यक्त करण्यायासाठीच. हे सर्व धोके ओळखून पवारांनी दोन दिवस प्रत्यक्ष बारामतीत तळ देऊन आत्मचिंतन केले आणि कोअर टीमच्या बैठकीत अगदी बूथ लेव्हल पर्यंत संवाद अभियान सुरू ठेवण्यायाच्य प्रत्यक्ष सूचना दिल्या आहेत.

थोरल्या पवारांनी सातारा गाठून पक्षाचे खासदार उदयनराजेंची भेट घेतली आणि तिकिटाचे संकेत दिल्यायापासून साताऱ्यात विरोधाची भांडी वाजू लागली. मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत उदयनराजेंचे तिकिट कन्फर्म होता होता राहिले तिकडे बारामतीत आमदार शिवेंद्रराजे समर्थकांनी बारामती गाठून उदयनराजें विषयीचा नाराजीनामा वाचून दाखवला. सातारा व जावली तालुक्‍यात तर पध्दतशीर पणे उदयनराजेंना विरोध करण्याचे राजकीय डावपेच सुरू झाले अगदी कुडाळ (ता जावली) येथे मानकुमरे रिसॉर्टमध्ये सुनियोजित तालीम करून साताऱ्यात चंद्रविलास हॉटेलमध्ये मिसळच्या रेसिपीला अंर्तगत राजकारणाचा तडका देण्यात आला. या खेळ यांकडे उदयनराजे भोसले यांनी धूर्तपणाने लक्ष दिले नाही मात्र नगरपालिका निवडणूकीमध्ये पेटलेला अंर्तगत गृहकलह आता लोकसभेत भडकायला सुरवात झाल्याने राजे समर्थक संभ्रमित आहेत. भाजपचे मागचे दोर कापत उदयनराजेंनी राष्ट्रवादीशी जमवून घेतले आहे मात्र यापूर्वी नेत्यांसोबत पटत नसल्याने उदयनराजे पक्षाच्या प्रचारापासून दूर राहत होते. उदयनराजेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पवारांनी राष्ट्रवादीतून तिकीट पक्के झाल्याचे सांगत त्यांची इच्छाही व्यक्त केली आहे. आता उदयनराजे पवारांची ही इच्छा पूर्ण करतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उदयनराजेंनी भाजपसोबतही जवळीक वाढविली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत व्यासपीठावर जात त्यांची स्तुतीही केली होती. तसेच पत्रकारांशीही ते खुलेपणाने बोलत होते. यामुळे उदयनराजे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चाही होत होती. यामुळे पवारांनी साताऱ्यात भेट घेत उदयनराजेंना तिकीट पक्के असल्याची खात्री दिली. तसेच राज्यभरात पक्षाचा प्रचार करावा अशी अपेक्षाही व्यक्त केली होती . या सगळ्या घडामोडी ऑलवेल असताना माढा व सातारा या दोन्ही बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची इभ्रत पणाला लागली आहे मात्र अजून बऱ्याच राजकीय घडामोडी घडायच्या आहेत. पवारांच्या राजकारणाचा काही नेम नसतो विरोधकांना चारीमुंडया चित करणारे पवार सध्या तरी माढयात अंर्तगत गटबाजीमुळे अडचणीत आहेत. तर साताऱ्यात उदयनराजे विरोधाची धार कशी कमी करायची याची राष्ट्रवादीला चिंता आहे.

काय आहे पवारांची उदयनराजेंकडून अपेक्षा

उदयनराजेंवर प्रेम करणारे आणि त्यांचे आकर्षण मोठा तरुणवर्ग राज्यभरात आहे. त्यांच्या कॉलर उडविण्याच्या स्टाईलचीही बरेचजण कॉपी करतात. या तरुणाईला राष्ट्रवादीकडे वळविल्यास त्याचा लोकसभेसह विधानसभेलाही फायदा होण्याची शक्‍यता आहे. यामुळे पवारांनी त्यांना राज्यभर पक्षाच्या प्रचारासाठी येण्याचा सल्ला दिला आहे. मात्र साताऱ्यातच विरोधाचा भडका उडाल्याने पक्षांर्ततग राजकारण टोकाचे होणार हे आता स्पष्ट झाले आहे .

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)