साताऱ्यात पालिकेकडून अतिक्रमणांना पुन्हा अभय

पोलीस बंदोबस्ताचे कारण; शो केल्यानंतर पालिका प्रशासनाची चुप्पी

सातारा – गेल्या आठवड्यात रडतखडत सुरू झालेली पालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम पोलीस बंदोबस्ताअभावी रेंगाळत चालली आहे. पालिकेची राजकीय इच्छाशक्‍ती नसल्याने व सुविधांच्या खोळंब्याने अतिक्रमणांना पुन्हा अभय मिळू लागले आहे. दोन- तीन दिवस अतिक्रमणे हटविण्याचा “शो’ पालिकेने केला. या मोहिमेने रस्ते काही मोकळे झाले नाहीत. उलट ग्रेड सेपरेटरने शहराचा श्‍वास आवळला आहे. त्या तुलनेने एकेरीच्या निर्णयात अतिक्रमण मोहिमेला राजकीय बळ तर नाहीच पोलीस बंदोबस्ताचा विषयसुध्दा कागदोपत्री रेंगाळत पडला आहे. मागे एकदा कोल्हापूरच्या तत्कालिन विशेष पोलिस महानिरीक्षकांनी साताऱ्यात येऊन अतिक्रमण हटवण्याचा फतवा काढला होता. त्यावर खासदारांचा राजकीय स्टंट भलताच चर्चेत राहिला होता. आता साताऱ्यात वाढणाऱ्या अतिक्रमणांवर पालिका प्रशासनाने मूग गिळल्याची सातारकरांची भावना झाली आहे

पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने पोलिस बंदोबस्तात पोवई नाका मंडईतील रस्त्यावर पडलेल्या खोक्‍यांची अतिक्रमणे हटविण्यास सुरवात केली होती. त्यानंतर थेट गोडोली व यादोगोपाळ पेठ येथे जुजबी टपऱ्या हटवण्याच्या कारवाया केल्यावर अतिक्रमण निरीक्षकांनी पोलिसांना मोहिमेसाठी बंदोबस्त मागितला आहे. दोन दिवस पाहणी झाल्यानंतर सेव्हन स्टारसमोरील अतिक्रमणे काढायचा निर्णय झाला होता. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी हा निर्णय तांत्रिक कारणामुळे स्थगित केला. त्यामुळे शहर विकास विभागही अवाक झाला आहे. कालिदास पंप ते पोलिस कवायत मैदान रस्त्यावरील खोकी व रस्त्यावरील विनापरवाना फ्लेक्‍स काढण्यात आले. एवढेच काय ते चार दिवसांच्या मोहिमेचे संचित मानावे लागेल. त्यानंतर मोहिमेतून अतिक्रमण विभाग बेपत्ता झाला तो अद्यापपर्यंत. त्यामुळे ही मोहीम थंडावल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यात रस्त्यांवरील अतिक्रमणांबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालिन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांनी अत्यंत आग्रही भूमिका मांडत पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एकेरी वाहतुकीचच्या निर्णयात जे रस्ते घेतले त्यावर आता अतिक्रमणांचे अक्षरशः कोंडाळे झाले आहे.
पालिकेच्या दारातच अतिक्रमण पोवई नाका परिसर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय परिसर, गोडोली, राजपथ व कर्मवीर पथ, गणतपराव तपासे पथ, समर्थ मंदिर परिसर, बस स्थानक परिसर, रविवार पेठ जुनी मंडई आदी प्रमुख ठिकाणी अतिक्रमणे तशीच आहेत. एका व्यावसायिकाने पालिका मुख्यालयाच्या दारातच खोके टाकून पालिकेला आव्हान दिले आहे. खोक्‍यांची एवढी अतिक्रमणे बोकाळली असताना पालिका अधिकारी- पदाधिकारी शांत कसे बसू शकतात, असा प्रश्‍न सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)