प्रयागराज – लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात देशातील 7 राज्यात रविवारी मतदान पार पडत आहे. निवडणुकीच्या दरम्यान उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील भरैचा नावाचे गाव नेहमीच चर्चेमध्ये असते. याला कारण म्हणजे या गावामध्ये एक असे कुटुंब आहे ज्यामध्ये मतदारांच्या संख्येने अर्धशतक ओलाडले आहे.
भरैचा गावातील राम नरेश यांचे कुटुंब सर्वात मोठे आहे. या कुटुंबामध्ये 82 सदस्य असून 66 जण यंदा मतदानाचा हक्क बजावणार आहे. यापैकी 8 मतदार हे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. यामध्ये सर्वात वयस्कर राम नरेश हे असून त्यांचे वय 98 वर्षे आहे.
राम नरेश यांचे पुत्र राम हृदय यांनी सांगितले की, कुटुंबातील दोन सदस्य मुंबईमध्ये काम करतात. या एवढ्या मोठ्या कुटुंबाला दिवसा 15 किलोचा भात आणि 15 किलो गव्हाच्या चपात्या लागतात. हे संपूर्ण कुटुंब जेव्हा रांगेमध्ये मतदानासाठी येते तेव्हा मतदान केंद्रावर यांचीच गर्दी असते. हा अनेकांच्या कुतुहलाचा विषय आहे.