म्हसवडमध्ये डुकरे बनली सैराट

मोकाट डुकरांच्या हल्ल्यात बालक जखमी : पालिकेने उपाययोजना करण्याची मागणी

म्हसवड –
म्हसवड शहरात सध्या मोकाट प्राण्यांनी अक्षरश: धुडगूस घातला असून नुकतेच शहरातील एका शालेय विद्यार्थ्यावर मोकाट डुकराने अचानक हल्ला करुन जखमी केले. शहरातील मोकाट प्राण्यांकडुन वारंवार अशा प्रकारचे हल्ले बालकांवर होत असल्याने शहरवासीयांत भीतीचे वातावरण असून मोकाट डुकरांचा बंदोबस्त नगरपरिषदेने करावा अशी मागणी म्हसवडकर नागरिकांतून होत आहे.

येथील म. फुले चौक ते जिल्हा बॅंक हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. याच परिसरातील शहरातील मोकाट कुत्री व डुकरांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असतात. या जनावरांचा पादचारी व्यक्तींना व दुचाकीस्वारांना मोठा त्रास नेहमीच सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक नागरिकांनी यापूर्वी पालिकेकडे याबाबत तक्रारी करुनही पालिकेने नागरिकांच्या अशा तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. त्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा व डुकरांच्या झुंडीच्या झुंडी फिरताना दिसत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

येथील जिल्हा बॅंक परिसरात प्रतिक धसाडे हा बालक घराबाहेर खेळत असताना अचानक त्याठिकाणी मोकाट जनावरांचा कळप आला. त्यातील एका डुकराने बालकावर अचानकपणे हल्ला चढवला. यात ते बालक जखमी झाले असुन त्याच्या हाताला, पायाला व पाठीलाही गंभीर इजा झाल्या आहेत. याच बालकावर शहरातील मेनरोडवर अशाच प्रकारे मोकाट डुकराने हल्ला करुन त्याला जखमी केले होते. यापुर्वीही शहरात फिरणाऱ्या मोकाट डुकरांनी शालेय विद्यार्थ्यावर अशाच प्रकारे हल्ला चढवत त्यांना जखमी केली असून आजवर शहरातील 5 ते 7 विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे डुकरांकडुन हल्ले झाले आहेत. एखाद्या दुचाकीला पिशवी लावलेली असेल तर ती डुकर दुचाकीही पाडत आहेत. पालिकेने तातडीने पाऊले उचलावीत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

मोकाट गाढवांकडुन पिकांचे मोठे नुकसान

शहराला सध्या मोकाट प्राण्यांच्या कळपांनी ग्रासले असून शहरात मोकाट कुत्री व डुकरांचे कळप फिरत असताना शहरात मोकाटपणे गाढवेही फिरू लागली आहेत. मोकाट फिरणाऱ्या गाढवांच्या कळपाने येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून त्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी शेकडो शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे महसूल विभागाकडे केली आहे.

म्हसवड शहरात फिरत असलेल्या मोकाट जनावरांचा नागरीकांना त्रास होत असुन त्यांच्याकडुन लहान मुलांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे शहरवासियांना असुरक्षित वाटत आहे. याबाबत नागरिकांनी यापुर्वी अनेकवेळा पालिकेकडे तक्रारी करुनही पालिकेने दुर्लक्ष केले आहे. एखादी निष्पापाचा बळी गेल्यावर पालिका याविषयी गांभीर्य दाखवणार का?

– संजय बळवंत टाकणे, म्हसवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)