पोलिस अधिकार्यासह 10 जखमी
कोल्हापूर- लहान मुलांतील क्रिकेट खेळण्याच्या वादातून मंगळवारी रात्री सोमवार पेठ परिसरातील अकबर मोहल्ला आणि महाराणा प्रताप चौक परिसरात दोन गटांत तुफान राडा झाला. दोन्ही गटांनी परस्परांवर प्रचंड दगडफेकीसह काचेच्या बाटल्या आणि कौलांचा वर्षाव केला. त्यात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसंतराव बाबर यांच्यासह दहाजण जखमी झाले आहेत. परिसरात दगडांसह काचांचा मोठा खच पडला होता. तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा पाचारण करण्यात आला. सहा वाहनांची तोडफोड झाली आहे.
रात्री उशिरापर्यंत 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दगडफेकीत पोलिस निरीक्षक वसंतराव बाबर, सहायक निरीक्षक सुनील पोवार, पोलिस कॉन्स्टेबल अमर पाटील, जुनेद खलिफा, जाफर सिंधी, रफीक मोमीन, अय्याज खलिफा, इम्तियाज खलिफा हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने अकबर मोहल्ला, शंकरराव जाधव चौक, देशभूषण हायस्कूल, आपण आपले मित्रमंडळ चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. रात्री उशिरापर्यंत परिसरात तणाव होता.