पुणे – परवानाधारक, वाहनचालकाच्या माहितीसह रिक्षाचा तपशील असणारा स्टीकर रिक्षांना बसविण्याचे आदेश परिवहन कार्यालयाने दिले होते. गेल्या दोन महिन्यांपासून याची अंमलबजावणी होत आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 878 रिक्षांना हे स्टीकर बसविले आहेत.
राज्य परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयानुसार रिक्षाचालक, परवाना क्रमांक, रिक्षाचालकांचे फोटो, मोबाइल क्रमांक आदी माहिती असणारे हे स्टीकर लावण्याची प्रक्रिया प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये एप्रिल 2019 पासून राबविण्यात येत आहे. एप्रिल ते जून 2019 या कालावधीत केवळ 878 रिक्षांना हे स्टीकर बसविले आहेत. या स्टीकरवर “क्यु आर कोड’ असल्याने कोड स्कॅन केल्यानंतर रिक्षाचालकांची कुंडली प्रवाशांच्या हाती मिळणार आहे. यामुळे रिक्षाचालक आणि प्रवासी यामध्ये विश्वासार्हता निर्माण होण्यास मदत होणार आहे.
शहरामध्ये सुमारे 60 ते 65 हजार रिक्षा धावतात. मात्र, या मोहिमेला केवळ 878 जणांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे वारंवार रिक्षाचालकांनी तातडीने आपल्या रिक्षांना “स्टीकर’ बसवावेत असे आवाहन आरटीओ कार्यालयाच्या वतीने करून देखील रिक्षाचालक प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आहे.