अवघ्या तीन महिन्यांत 350 खटले निकाली

पुणे – कामगार उपायुक्त कार्यालयाने जलद कारभाराचा आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. या कार्यालयाने अवघ्या तीन महिन्यांत समुपदेशन आणि तडजोडीच्या माध्यमातून तब्बल साडेतीनशे खटले निकाली काढले आहेत, विशेष म्हणजे याच पध्दतीने आणखी जास्तीतजास्त खटले निकाली काढण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे.

पुणे विभागातील कामगार उपायुक्त कार्यालयाच्या अखत्यारीत पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याचा भाग येतो. गेल्या काही वर्षांच्या कालावधीत या विभागात मोठ्या प्रमाणावर कारखानदारी वाढली आहे, त्यामुळे आपोआपच या कार्यालयात वाद विवादाच्या खटल्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. हे वास्तव असतानाच या कार्यालयाकडे असलेले मनुष्यबळ जेमतेम होते, त्यातच नव्याने करण्यात येणाऱ्या भरतीवर निर्बंध असल्याने प्रशासनालाही मर्यादा आल्या होत्या.

त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी कंत्राटी पध्दतीवर कामगारांची भरती करण्यात आली आहे, त्यातून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरीही खटल्यांचा ताण कमी झालेला नाही. त्यामुळे हे खटले तडजोडीने निकाली
काढण्याचा प्रयोग प्रशासनाच्या वतीने राबविंण्यात आला होता, त्यासाठी वादी आणि प्रतीवादींचे खास पथकाच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात येत आहे. त्याला बहुतांशी प्रमाणात यश येत आहे, त्यानुसार अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत अशा पध्दतीने साडेतीनशे खटले निकाली काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. यापुढील कालावधीतही असाच फंडा राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कामगार उपायुक्त कार्यालयाचे समन्वयक बी. जी. काळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)