केवळ 11 दिवसांत सेन्सेक्‍स वाढला 1000 अंकांनी 

सेन्सेक्‍सची 38 हजारांवर झेप 
मुंबई: कंपन्यांच्या चांगल्या ताळेबंदामुळे देशातील तसेच परदेशातील संस्थागत गुंतवणूकदार खरेदी करीत असल्याचे वातावरण बाजारात आले. त्यातल्या त्यात बॅंकांचे शेअर गुंतवणूकदारांना जास्त आकर्षक वाटत आहेत. त्यामुळे
निर्देशांक उच्च पातळीवर असूनही खरेदीचा जोर वाढल्यामुळे शेअरबाजाराचे निर्देशांक गुरुवारी नव्या उच्चांकी पातळीवर झेपावले. मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सक्‍स प्रथमच 38 हजार अंकाच्यावर बंद झाला आहे. केवळ 11 दिवसांत सेन्सेक्‍स 1000 अंकानी वाढला आहे.
गुुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 136 अंकानी म्हणजे 0.36 टक्‍क्‍यांनी उसळून 38024 अंकांवर विराजमान झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 20 अंकांनी वाढून 11470 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. गेल्या पाच दिवसांपासून निफ्टी एकतर्फी वाढत आहे. मोठ्या कंपन्यांप्रमाणे छोट्या कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाल्यामुळे स्मॉल कॅप 0.29 टक्‍क्‍यांनी तर मिड कॅप 0.59 टक्‍क्‍यांनी वाढला. ऊर्जा, दूरसंचार, ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्या आज तेजीत होत्या.
काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 568 कोटी रुपयांच्या तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 30 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. आज जागतिक शेअरबाजारातील वातावरणही सकारात्मक होते. आयसीआयसीआय बॅंक, स्टेट बॅंक आणि ऍक्‍सिस बॅंकेने आजच्या तेजीचे नेतृत्व केले.
चीनने अमेरिकेच्या अनेक वस्तूवर आयात शुल्क लावल्याचा गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाला नाही. कंपन्यांचे चांगले ताळेबंद जाहीर होत आहेत. त्याचबरोबर क्रुडचे दर आता कमी पातळीवर स्थिरावले असल्याचे वातावरण आहे. त्यामुळे निर्देशांक उच्च पातळीवर असूनही बाजारात उमेद कायम आहे. गेल्या आठवड्यात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी कमी अधिक प्रमाणात खरेदी सुरू केल्यामुळे आता किरकोळ गुंतवणूकदारही आश्‍वस्त झाले आहेत.
या अगोदर सेवा क्षेत्राचा पीएमआय वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधाच्या उत्पादकतेत वाढ झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. आता शुक्रवारी औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर होणार आहे. पायाभूत सुविधा क्षेत्राची उत्पादकता वाढल्यानंतर औद्योगिक उत्पादन वाढते. औद्योगिक उत्पादन किमान 5.6 टक्‍क्‍यांनी वाढणार असल्याचे बोलले जात आहे, असे जिओजी वित्तीय सेवाचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.
आयसीआयसीआय बॅंकेने कसलेही कर्ज लपवले नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे आज या बॅंकेच्या शेअरच्या भावात तब्बल 4.64 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. त्याचबरोबर ऍक्‍सिस बॅंकेचा शेअर 3.86 टक्‍क्‍यांनी तर स्टेट बॅंकेचा शेअर 2.63 टक्‍क्‍यांनी वाढला.
एनटीपीसी, पॉवर ग्रीड, कोल इंडिया, टाटा स्टील, इन्फोसिस या कंपन्यांचे शेअरही आज तेजीच्या वातावरणात 1.69 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. मात्र, असे असले तरी आज भारती एअरटेल कंपनीचा शेअर 4.64 टक्‍क्‍यांनी कोसळला. या कंपनीवरील कर्ज वाढले आहे. त्याचबरोबर कंपनीच्या परदेशातील कामकाजातून नफा आणि महसूल कमी होत असल्यामुळे या कंपनीच्या शेअरची विक्री झाली. ओएनजीसी, कोटक बॅंक, एचडीएफसी बॅंक, मारुती सुझुकीचे शेअरही आज घसरले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)