दिल्लीत “जैश’चा म्होरक्‍या सज्जाद खान जेरबंद

File photo

नवी दिल्ली: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तपासात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या हल्ल्याचा सुत्रधार मुदस्सिर याचा सहकारी आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद खान (27) याला गुरुवारी मध्यरात्री लाल किल्ला परिसरातून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आणण्यात भारताला यश आले आहे.

विशेष पोलीस दलाचे पोलीस उपायुक्‍त प्रमोद सिंग कुशावह यांनी सांगितले की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सज्जाद खानचा सहभाग होता. हा हल्ला झाल्यानंतर मुदस्सिर याने व्हॉटस्‌ ऍपवरून सज्जादशी संपर्क साधला होता. तसेच हा हल्ला घडविणा-या आदिल दार याचा एक व्हिडिओ त्याने पाठविला होता. याशिवाय सज्जाद खानवर स्लीपर सेल स्थापन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यासाठी तो दिल्लीत सक्रीय झाला असल्याची गुप्त माहिती मिळाली होती, अशी माहिती त्यांनी दिली.

एनआयएकडून सज्जाद खान आणि मुदस्सिर खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच दहशवादी संघटनेत सक्रिय असलेल्या सज्जाद खानच्या दोन भावांनाही ठार मारण्यात आले होते, असे कुशावह यांनी सांगितले.

जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यामागचा सुत्रधार मुदस्सिर अहमद खान हा होता. भारतीय जवानांनी त्याला एका चकमकीत ठार केले आहे. त्यानंतर आता त्याच्या सहकाऱ्याला पकडण्यात सुरक्षा दलाला मोठे यश आले आहे.

दिल्ली पोलिसांनी सज्जादला अटक केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी आता सज्जादची चौकशी करत आहेत. दरम्यान भारतीय सेनेने सांगितले की, जैशचा दहशतवादी मुद्दसिर पुलवामा हल्ल्यामागचा मास्टरमाईंड होता. सज्जाद हा त्याचा जवळचा सहकारी होता.

भारतीय सेनेने सांगितले की, पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी जम्मू काश्‍मीरमध्ये कारवाई सुरु केली आहे. या कारवाईदरम्यान जम्मू काश्‍मीरच्या शोपियान, बारामुल्ला, बंदीपोरा, राजौरी, काश्‍मीर भागात अनेक चकमकी झाल्या आहेत. या चकमकींमध्ये आतापर्यंत 22 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)