बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीत धुसफूस सुरू 

जागावाटपावरून कॉंग्रेस नेते नाराज

पाटणा –बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीत धुसफूूस सुरू झाल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीसाठी योग्य वाटा मिळाला नसल्याचा सूर आळवण्यास त्या राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी सुरूवात केली आहे. तर, महाआघाडीतील काही घटक पक्षांमधील बेबनावही चव्हाट्यावर आला आहे.

जागावाटपाविषयी नाराजी व्यक्त करताना बिहारमधील काही कॉंग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना उशीर होण्याआधी पाऊले उचलण्याचे इशारेवजा आवाहन केले आहे. महाआघाडीचे प्रमुख घटक असणाऱ्या राजद आणि कॉंग्रेसमध्ये दरभंगा मतदारसंघावरून पेच निर्माण झाला आहे. त्या जागेचे प्रतिनिधित्व माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद करत आहेत. आझाद यांनी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मागील निवडणुकीत त्या जागेवर राजदच्या उमेदवाराचा थोड्या मताधिक्‍याने पराभव झाला. ते कारण पुढे करून राजद दरभंगामधून लढण्यास उत्सुकत आहे. मात्र, विद्यमान खासदार म्हणून आझाद यांना तिथून लढायचे आहे. त्यांनी कॉंग्रेस नेतृत्वाने निर्णायक पाऊले उचलावीत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

कॉंग्रेसच्या विद्यमान खासदार रंजित रंजन यांच्या सुपौल जागेवरूनही रस्सीखेच सुरू आहे. राजदच्या स्थानिक नेत्यांनी पक्षाकडून होणाऱ्या शिस्तभंगाच्या कारवाईची तमा न बाळगता त्या जागेवरून लढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे रंजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशातच कॉंग्रेसला योग्य वाटा मिळाला नसल्याची भावना पक्षाचे कार्याध्यक्ष कौकब कादरी यांनी व्यक्त केली आहे. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर, महाआघाडीच्या घटक पक्षांमधील धुसफुसीमुळे राजद नेते तेजस्वी यादव यांनी त्यांच्या काही सभा रद्द केल्याचे वृत्त समोर आले. एकंदर, महाआघाडीची वाटचाल पेचाकडे सुरू असल्याचेच सध्याचे चित्र आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here