इम्रान खान यांनी मोदींना फोन करून केले अभिनंदन

एकत्र काम करण्याची व्यक्त केली इच्छा

इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दूरध्वनी करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवडणुकीतील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. दोन्ही देशांतील लोकांच्या उज्जवल भवितव्यासाठी एकत्र काम करण्याची इच्छाही खान यांनी व्यक्त केल्याची माहिती पाकिस्तानी विदेश मंत्रालयाने दिली आहे. इम्रान खान यांनी मोदींना फोन करण्याआधी त्यांचे ट्विटरवरून अभिनंदन केले होते. इम्रान खान यांनी दक्षिण अशियात शांतता, समृद्धी आणि स्थैर्य नांदावे यासाठी भारताच्या सहकार्याने काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

शांततेसाठी दहशतवादमुक्त वातावरण महत्वाचे – मोदी
प्रादेशिक शांततेसाठी दहशतवादमुक्त वातावरण अधिक महत्वाचे आहे असे पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेच्यावेळी नमूद केल्याची माहिती भारतीय विदेश मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली. मोदींनी पाकिस्तानी पंतप्रधानांचे अभिनंदनाच्या कॉलबद्दल आभार मानले असेही या सूत्रांनी सांगितले. पुढील महिन्यात किरगीजस्तान येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची परिषद होत आहे, त्या परिषदेला हे दोन्ही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी या दोन्ही नेत्यांना भेटण्याची संधी मिळणार आहे.

मोदींकडूनही त्यासाठी सहकार्य मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली आहे. भारतात निवडणूक प्रचार सुरू असतानाच मोदी पंतप्रधान झाले तर काश्‍मीरचा प्रश्‍न सुटण्यास मोठी मदत होईल असा विश्‍वास इम्रान खान यांनी व्यक्त केला होता. त्यावरून भारतात मोठेच राजकीय वादंग माजले होते. पाकिस्तान विरोधावर निवडणूक लढवणाऱ्या भाजपची इम्रान खान यांच्या या वक्तव्यामुळे मोठीच गोची झाली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here