कागदपत्रातील चुका सुधारताना…

मालमत्तेसंबंधी व्यवहारात कागदपत्रे महत्त्वाची असतात. जर त्यात काही चूक असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्त करणे गरजेचे आहे. कायदेशीर कागदपत्रे तयार करणे हे खूपच वेळखाऊ काम आहे. यात तयार करताना कोणती ना कोणती चूक होण्याची शक्‍यता असते. अशा स्थितीत चुकीने घाबरून जाण्याऐवजी ती वेळीच दुरुस्त करणे हिताचे ठरेल.

मालमत्तेच्या व्यवहारात अंतिम रूप देण्यासाठी कागदपत्रे तयार केली जातात. त्यातही काही चुका, उणिवा राहू शकतात. कायद्याशी निगडित कागदपत्रे असल्याने किरकोळ चुका वेळीच दुरुस्त करणे देखील महत्त्वाचे आहे. कायदेशीर कागदपत्रात काटछाट करता येत नाही. त्यात आणखी एक डीड तयार करावे लागते. त्यास करेक्‍शन डीड, कन्फर्मेशन किंवा रेक्‍टिफिकेशन डीड असेही म्हटले जाते.

करेक्‍शन, कन्फर्मेशन किंवा रेक्‍टिफिकेशन डीड जाणून घ्या
मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार असो जसे की सेल, मॉर्गेज, लीज आदींना अंतिम रूप देताना कायदेशीर कागदपत्रे तयार केली जातात. ही कागदपत्रे भरपूर असतात. त्यामुळे त्यात नावाचे स्पेलिंग, मालमत्तेचे क्षेत्रफळ आदी माहितीवरून किरकोळ चुका होऊ शकतात. टायपिंगची चूक किंवा मोजमापात चुका होऊ शकते. त्यांना दुरुस्त करण्यासाठी करेक्‍शन डीड करावे लागते. अर्थात या चुकांत तथ्य असायला हवे. कायद्यासंबंधी झालेली चूक सुधारणा करताना पुन्हा नव्याने प्रक्रिया करावी लागते. रेक्‍टिफिकेशन डीडच्या माध्यमातून अशा प्रकारची चूक दुरुस्त करता येते. वास्तविक रेक्‍टिफिकेशन डीडला न्यायालयातून परवानगी घ्यावी लागते.

नोंदणी करा
द इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्‍टअंतर्गत या डींडला नोंदणी करावी लागते. त्यानुसार कोणत्याही अचल मालमत्तेच्या व्यवहारात व्यक्तीच्या हितासाठी कागदपत्रे नोंदणीकृत असणे अत्यावश्‍यक आहे. मूळ कागदपत्रे नोंदणीकृत असले तरी करेक्‍शन डीडला पुन्हा रजिस्टर करणे गरजेचे आहे. यावर मुद्रांक शुल्क भरावे लागते.

कन्फरमेशन डीडला समजून घ्या
जर एखाद्या पक्षाने कागदावर सही करताना एखादी चूक केली असेल आणि त्याने वेळेवर नोंदणी केली नसेल किंवा एखाद्या कारणाने उपनिबंधकाने नोंदणी करून घेण्यास नकार दिला असेल किंवा मालमत्तेची कागदपत्रे एक्‍झिक्‍यूट झाले नसतील किंवा सही झाल्यानंतर चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर केले नसेल तर संबंधित पक्षाला कन्फरमेशन डीड करावे लागते. यात मूळ डीडच्या एक्‍झिक्‍यूशनची खातरजमा केली जाते. तसेच जुने कागदपत्रे अचूक आहेत, हे सिद्ध केले जाते. मूळ कागदपत्राची एक प्रत कन्फरमेशन डीडबरोबर जोडावी लागते. याठिकाणी कागदपत्राच्या एक्‍झिक्‍यूशनचा अर्थ हा सहीशी जोडला जातो. डीडचा थोडक्‍यात अर्थ असा की, विकलेल्या मालमत्तेचे सर्व अधिकार आता खरेदीदाराकडे आल्याचे आणि पहिल्या पक्षाचा या मालमत्तेवर कोणताही अधिकार राहिला नाही. थोडक्‍यात काय तर मालमत्ता खरेदी करताना कागदत्रांची तपासणी तज्ज्ञ मंडळीकडून किंवा वकिलाकडून करून घ्यावी. भविष्यात मालमत्तेविषयी कटकटी निर्माण होणार नाहीत.

– जगदीश काळे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)