मुंबई : राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यात प्रत्येक पक्ष आपापल्या परीने तयारीला लागला आहे. त्यातच आता 21 जुलै रोजी भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. मुंबईतील गोरेगावच्या नेस्को संकुलात राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे.
भाजपच्या या बैठकीत राज्यभरातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांच्या बैठकांना वेग आला आहे. त्यात शिवसेनेकडून जनआशिर्वाद यात्रा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा होणार आहे. तसेच या दौऱ्याच्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही बोलले जात आहे.