अशोक गायकवाड यांची मागणी; रिपब्लिकन पक्षाचा आंदोलनाचा इशारा
सातारा – जिल्ह्यात दोन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी एका घटनेमध्ये आरोपीला तात्काळ जामीन मिळवून देण्यासाठी पोलिसांनी सहकार्य केले तर दुसऱ्या घटनेत संशयित वडिलांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे तात्काळ आरोपींना अटक करा, अन्यथा रिपब्लिकन पक्ष आंदोलन छेडणार असल्याचा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला.
एका मुलीचा दि.12 जून रोजी विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. त्याप्रकरणी तक्रारीनंतर आरोपी मुलाला अटक करण्यात आली. मात्र, केवळ सात दिवसांच्या आत संशयिताची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यामागे संशयिताचे वडील आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक देवाणघेवाणीचे कारण आहे. त्यामुळे संशयिताच्या वडिलांचे आणि संबधित पोलीस अधिकाऱ्याचे कॉल डिटेल्स तपासण्यात यावेत, अशी मागणी आहे.
त्याचबरोबर संशयित मुलगा जामिनावर सुटल्यानंतर त्याने मुलीच्या घरावर दगडफेक करत धमक्या दिल्या. या प्रकरणी मुलीसह तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी दमदाटी करून गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. त्यामुळे संशयिताचा जामीन तात्काळ रद्द करून त्याला अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
त्याचबरोबर दुसऱ्या घटनेत वडिलांनीच आपल्या मुलीवर अत्याचार केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. दोन्ही घटनांमध्ये पीडित मुलींना तात्काळ न्याय मिळावा, या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून येत्या 8 दिवसांत संशयितांना अटक न केल्यास आंदोलन करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.