मी तिकीट मागणारा नाही, तिकीट देणारा

महादेव जानकर ः आंबेगाव बुद्रुकमध्ये “रासप’च्या पदाधिकाऱ्यांची बैठक
आंबेगाव बुद्रुक – मी तिकीट मागणारा नाही, तिकीट देणारा आहे. जे करेन ते पक्षाच्या हितासाठीच करेन. पक्षाची ताकद दाखवण्यासाठी लोकसभा निवडणुकीनंतर पाच लाख लोकांना घेऊन मुंबईमध्ये मोर्चा काढेन, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले.

राधाकृष्ण सभागृहामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाचे धोरण ठरविण्यासाठी महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने तालुका, जिल्हा स्तरातून यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष एस. एल. अक्केसागर, मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा श्रद्धा भातंबरेकर, राष्ट्रीय महासचिव सुशील पाल, प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, अजित पाटील, माणिकराव दांगडे, कार्याध्यक्ष विनायकराव भिसे, काशिनाथ शेवते, अण्णासाहेब रूपनर, सरचिटणीस उज्ज्वला हाके, माढा अध्यक्ष ज्ञानेश्वर सलगर, पुणे अध्यक्ष हरीश खोमणे उपस्थित होते.

यावेळी म्हणाले जानकर की, पक्षावर गैर विश्वास दाखवून पक्ष सोडणाऱ्या गद्दारांना पुन्हा पक्षात स्थान नाही. माझ्या पक्षाचे कार्यकर्ते स्वाभिमानी असून पक्ष वाढीसाठी पदाधिकारी मोठ्या निष्ठेने काम करीत आहे. गेल्या पाच वर्षांत 98 नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. लोकसभेसाठी देशभरात 100हून अधिक ए, बी, फॉर्म वितरित केले आहेत. मी आतापर्यंत लोकांना काहीही दिले नाही. आता देण्याची वेळ आली आहे. पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला लागा.

कांचन कुल यांचे उमेदवारीबाबत विचारले असता ते म्हणाले की, आम्ही बारामती किंवा माढा लोकसभेसाठी पक्षातर्फे जागा लढवण्यासाठी इच्छुक होतो. राहुल कुल हे आमच्या पक्षाचे आमदार आहेत. त्यांच्या पत्नीला उमेदवारी देताना आम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते ते भाजपने केले नाही. त्यामुळे मी नाराज आहे. त्यामुळे सध्या “वेट ऍन्ड वॉच’ची भूमिका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)