विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची आणि वारकऱ्यांची फसवणूक : कर्मचारी निलंबित
पंढरपूर, (प्रतिनिधी) – सुमारे 10 वर्षांपूर्वीच्या पावती पुस्तकाचा बेकायदेशीरपणे वापर करून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची आणि वारकऱ्यांची फसवणूक समितीच्या कर्मचाऱ्यानेच केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी कर्मचारी सिद्धेश्वर घायाळ याला मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी निलंबित केले आहे.
मंदिर समितीचा कर्मचारी सिद्धेश्वर घायाळ याने दर्शन मंडप आणि मुख्य मंदिर येथील माळवदावर बसून आषाढी एकादशीच्या दिवशी वारकऱ्यांना 2009-10 च्या जुन्या पुस्तकातील पावत्या देऊन त्यांच्याकडून सुमारे 20 हजार रुपये वसूल केले आहेत. यादरम्यान ज्या वारकऱ्यांनी देणगी देऊन पावत्या घेतल्या होत्या, त्यांना मंदिर समितीच्या अन्य देणगी पावती केंद्रातील पावत्या वेगळ्या असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आपल्याला मिळालेल्या पावत्या बोगस असाव्यात असा संशय त्यांना आल्यामुळे त्यांनी ही बाब मंदिरात बंदोबस्तास असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणून दिली.
त्या पोलिस कर्मचाऱ्याने मंदिर समितीकडे संपर्क साधला असता या जुन्या पावत्या बेकायदेशीररित्या फाडल्याचे आणि वारकरी तसेच मंदिर समितीला फसविल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंदिर समितीचे कर्मचारी व पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज पाहून या पावत्या फाडणाऱ्या सिद्धेश्वर घायाळ याला पकडले. वास्तविक सिद्धेश्वर घायाळ याच्याकडे देणगी वसूलीचे काम नव्हते. तर दर्शन मंडपातील इलेक्ट्रिक विभागाचे काम होते. त्याचे काम संपल्यानंतर त्याने तिथेच बसून जुन्या पावती पुस्तकाद्वारे भाविकांकडून पैसे वसूल केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी घायाळ याला निलंबीत केले आहे. अशा प्रकारे आणखी काही पावती पुस्तके वापरली आहेत का याचीही तपासणी केली जाईल. चौकशीअंती दोन दिवसांत घायाळ याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती ढोले यांनी दिली.