जिल्हा परिषदेसह पालिकेचे अस्वच्छतेकडे दुर्लक्ष

त्रिशंकू भागातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

सातारा – सातारा शहराच्या त्रिशंकु भागातील गटराच्या पाण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. गेले अनेक महिने साईबाबा मंदिरापासून अण्णासाहेब कल्याणी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरच गटराचे पाणी साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शाळेतील मुंलाना या गटराच्या पाण्यातूनच नाक मुठीत धरून जावे लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. खासदार, आमदारांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरून वहाणाऱ्या गटराच्या पाण्याचा बंदोबस्त करण्याकडे सातारा पालिकेसह देशात स्वच्छतेचा डंका पिटणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेचेही दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी अनेकजण पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान या गटराच्या पाण्याचा बंदोबस्त झाला नाहीतर लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागेल, असा इशारा या परिसरात रहिवासी नागरिकांनी दिला आहे.

त्रिशंकू भागातील नागरिकांनी सांगितले की, गोडोली, कर्मवीर हौसिंग सोसायटी, सातारा गृह निर्माण सोसायटी असे अनेक भाग सातारा शहरालगत असले तरी पालिका हद्दीत यांचा समावेश झालेला नाही. त्यामुळे सातारा पालिका या त्रिशंकू भागातील नागरिकांच्या गटर, पाणी, रस्ते आदी सुविधांकडे दुर्लक्ष करीत असते. त्यामुळे त्रिशंकू भागात मोठे बंगले उभे राहिले. मात्र या ठिकाणी रस्ते, गटर, वीज अशा सुविधा मिळाल्या नसल्याने त्रिशंकू भागातील नागरिकांना अनेक बाबींना सामोरे जावे लागत आहे.

साईबाबा मंदिरापासून अण्णासाहेब कल्याणी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला कर्मवीर हौसिंग सोसायटी, सातारा गृह निर्माण सोसायटी आहेत. या दोन्ही सोसायट्या पालिका हद्दीत येत नाहीत. त्रिशंकु भागात यांचा समावेश असल्याने या सोसायटीचे गटराचे पाणी रस्त्यावररून वहात आहे. रस्त्यावर गटराच्या पाण्याचे डबके साचले आहे. त्यामुळे या परिसरात डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे. या गटराच्या साचलेल्या डबक्‍यापासून अण्णासाहेब कल्याणी शाळा अगदी हाकेच्या अंतरावरच आहे. त्यामुळे या गटराच्या पाण्याची दुर्गंधी शाळेपर्यंत पसरली आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना व पालकांना, पादचाऱ्यांना या परिसरातून जाताना नाक मुठीत धरून गटराच्या साचलेल्या पाण्यातून जावे लागते. अशावेळी एखादे वाहन जर गेले तर रस्त्यावरील डबक्‍यातील पाणी अंगावर उडत आहे.

अनेकवेळा गोडोली भागाचे नगरसेवक शेखर मोरे-पाटील यांच्याकडे व पालिककडे नागरिकांनी तक्रारी केल्या. मात्र तक्रारींची दखल घेतली जात नाही. पालिका म्हणते हा परिसर आमच्या हद्दीत येत नाही. त्यामुळे आम्ही सुविधा पुरवू शकत नाही. यानंतर सातारा पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण यांच्याकडेही तक्रारी केल्यातरी त्यांच्याकडून गटराच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात दखल घेतली जात नाही.

रस्त्यावरून वहाणाऱ्या गटराच्या पाण्यामुळे आमच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला असतानाही सातारा पालिका, सातारा पंचायत समिती या सरकारी यंत्रणांना जाग येत नाही. त्रिशंकु भागातील जनतेने सातारा पंचायत समिती सदस्य व नगरसेवकांना निवडून दिले तरी आमच्या प्रश्‍नाची दखलच घेत नाहीत. खासदार, आमदारांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला मतदान न करता बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणार आहे, असे यावेळी संतप्त नागरिकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)