आकुर्डी – महापालिकेच्या उर्दू विद्यालयांमध्ये शिक्षकांची तब्बल 45 पदे रिक्त आहेत. याखेरीज विद्यालयांमध्ये असलेल्या विविध सोयी सुविधांच्या अभावाकडे भाजप युवती आघाडीने निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
युवती आघाडीच्या शहराध्यक्षा निकीता कदम व शिष्टमंडळाने महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे यांना याबाबत निवेदन दिले. त्यामध्ये विविध समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. निवेदनात नमूद आहे की, महापालिकेकडून 14 उर्दू प्राथमिक शाळा व एक माध्यमिक विद्यालय चालविले जाते.
रुपीनगर, थेरगाव, खराळवाडी, लांडेवाडी, नेहरुनगर, दापोडी येथे इयत्ता नववी व दहावीचे वर्ग चालविले जातात. प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, उपशिक्षकांची तब्बल 45 पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या कार्यरत असलेल्या ज्येष्ठ व पात्र शिक्षकांमधून रिक्त पदे भरुन उर्वरीत जागांवर शिक्षकांची भरती करणे गरजेचे आहे.
सर्वच उर्दू शाळांना वर्ग खोल्या, खेळाचे मैदान व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. सर्व शाळांमध्ये संगणक व क्रीडा शिक्षकांची आवश्यकता आहे. उर्दू प्राथमिक शाळांमधील शिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे. सातवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दुसरी व तिसरीचे पुस्तक वाचता येत नाही.
उर्दू माध्यमाच्या सहा शाळांना चार वर्षे झाली परंतु, स्वतंत्र युडायस क्रमांक मिळाला नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना आकुर्डी शाळेतून परीक्षा अर्ज भरावा लागतो. या शाळांना अद्याप स्टाफ रुम, टेबल, खुर्ची, कपाट आदी सुविधा मिळाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना बेंचेस कमी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.