मनसे अध्यक्षांवर आक्षेपार्ह्य टीका केल्यास फटकेच; करून तर बघा – मनसेचे शेलारांना आव्हान

मुंबई – मुंबई येथील रंगशारदा सभागृहामध्ये आज भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसे प्रमुखांच्याच ‘स्टाईलमध्ये’ कार्पोरेट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राज ठाकरेंवर खोटारडेपणाचा आरोप लावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यापासून महाराष्ट्रभर विविध ठिकाणी सभा घेत भाजप नेतृत्वावर सडकून टीका केली होती. यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रभर सभा घेत असताना एखाद्या आंतरराष्ट्रीय कंपनीला शोभेल असं प्रेझेंटेशन सादर करत भाजप नेत्यांचे व्हिडीओ उपस्थितांना दाखवले होते. ‘लाव रे तो व्हिडीओ’ या मनसे प्रमुखांच्या ‘राज’गर्जनेची क्रेझ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरामध्ये सुरु झाल्याने भाजपतर्फे आज राज ठाकरे यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात आलं.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी रंगशारदा सभागृहात दोन स्क्रीन लावून राज ठाकरेंमार्फत लावण्यात आलेले आरोप कशाप्रकारे खोटेपणाचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी १९ व्हिडीओ क्लिप्स दाखविल्या. यावेळी बोलताना शेलार यांनी, “राज ठाकरेंनी जमवलेली माहिती ही अनन्व्हेरीफाईड सोर्सेसद्वारे जमवली असल्याने ती माहिती खोटी आहे.” असं देखील सांगितलं.

दरम्यान, शेलार यांनी मनसे अध्यक्षांवर लावलेल्या खोटारडेपणाच्या आरोपांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे संदीप देशपांडे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. देशपांडे यांनी शेलारांच्या आजच्या सभेवर एका पत्रकार परिषदेद्वारे हल्ला चावला असून ते म्हणतात, “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जर कोणी आक्षेपार्ह्य भाषेत टीका केली तर आम्ही त्याला मरणारच, अनुभवायचं असेल तर करून पहा. शेलार यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मनसे अध्यक्षांवर केलेले खोटारडेपणाचे आरोप साफ चुकीचे आहेत. त्यांनी सादर केलेले व्हिडीओ म्हणजे जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे. शेलार यांनी महाराष्ट्रातील बलात्काराची आकडेवारी सांगणारा मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ दाखवला मात्र मनसे अध्यक्ष देशातील बलात्कारांच्या संख्येबाबत बोलले होते.”

दरम्यान, संदीप देशपांडे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एका महिलेला बोलावलं होतं. सदर महिला ही भाजपाच्या एका वृत्तपत्रातील जाहिरातीमध्ये एका योजनेची लाभार्थी म्हणून दाखविण्यात आली होती. यावेळी त्या महिलेने सरकारने जाहिरातीद्वारे माझ्या बाबत खोटी माहिती प्रसिद्ध केल्याचा आरोप केला.

आता संदीप देशपांडे यांनी भाजपवर केलेल्या सहपुरावा आरोपांवर भाजप कशाप्रकारे उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)