सत्तेत आल्यास नागरिक सुधारणा विधेयक रद्दबाद ठरवू : राहुल गांधींचे मणिपुरी जनतेला आश्वासन

मनिपुर- निवडणूक आयोगाने देशभरामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून गेल्या दहा तारखेपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्या यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या मुख्य निवडणूक प्रचारकांना निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये उतरविण्यात आले आहे. काँग्रेसच्या प्रचाराची धुरा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही यांनी आपल्या खांद्यावर घेतली असून ते सध्या देशभरातील विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये सभा घेत आहेत.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आज मणिपूर येथील इंफाळ येथे एका जाहीर सभेसाठी दाखल झाले आहेत. या सभेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी मणिपूरच्या जनतेला सत्तेत आल्यास नागरिक सुधारणा विधेयक रद्दबाद करण्याचे आश्वासन दिले आहे. ते म्हणतात, “काँग्रेस सत्तेत आल्यास आम्ही येथील संस्कृतीचा आदर करू, आम्ही सत्ताधारी पक्षातर्फे मांडण्यात आलेले नागरिक सुधारणा कायदा विधेयक रद्दबाद ठरवू.”

तत्पूर्वी सत्ताधारी भाजपतर्फे नागरी सुधारणा कायदा विधेयक संसदेमध्ये मांडण्यात आल्यानंतर मणिपूरसह इतर शेजारील राज्यांमध्ये याविरोधात तीव्र प्रतिसाद उमटले होते. राहुल गांधींच्या आजच्या भाषणातील नागरिक सुधारणा विधेयकाचा उल्लेख मणिपूर येथील जनतेच्या भावनिक मुद्द्याला हात घालण्याचा प्रयत्न दिसतो मात्र मणिपुरी जनता राहुल गांधींच्या या आश्वासनाला कशाप्रकारे प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)