नवी दिल्ली: देशभरात सध्या राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. राम मंदिराच्या निर्मितीसाठी अध्यादेश काढण्याचीही मागणी होते आहे. अशात राम मंदिराच्या निर्मितीत कॉंग्रेसने आम्हाला साथ दिली तर मंदिराचा मार्ग मोकळा होईल, असे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी म्हटले आहे. राम मंदिराच्या निर्मितीत एकमेव बाधा आहे आणि ती म्हणजे कॉंग्रेसकडून होणारी कटकारस्थाने. ही कारस्थाने कॉंग्रेसने थांबवली आणि आम्हाला साथ दिली तर मंदिराची निर्मिती नक्कीच होईल.
राम मंदिराची निर्मिती व्हावी यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत. अशात कॉंग्रेस विविध कारस्थाने रचून हिंसाचार वाढवत आहेत. ज्यामुळे निर्मितीत बाधा येते आहे, असाही आरोप उमा भारती यांनी केला. बुधवारीच त्यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली. आपण राजकीय संन्यास घेतलेला नाही, गंगा नदीची स्वच्छता आणि राम मंदिराची निर्मिती यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. या दोन गोष्टींवर एका माणसाला विशेष लक्ष द्यावे लागेल आणि ती जबाबदारी मी स्वीकारली आहे. म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे उमा भारती यांनी बुधवारीच स्पष्ट केले.
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर केंद्रीय मंत्री उमा भारती या गंगा किनाऱ्यापासून 25 हजार किमीची पायी यात्राही काढणार आहेत. याआधी केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही 2019 मध्ये लोकसभा निवडणुका लढणार नसल्याचे जाहीर केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा