भाजपला जागा दिल्यास विजय निश्‍चित

संग्रहित छायाचित्र....

अकोले – भाजपला अकोले विधानसभेची जागा दिली जावी. जागा मिळाल्यास भाजपला विजय मिळेलच, असा विश्वास भाजपचे जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे व भाजपा संघटन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केला. भाजपची जिल्हा आढावा बैठक नगर येथे राष्ट्रीय महामंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी खा. सरोज पांडे यांच्या उपस्थितीत झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर, खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी खासदार दिलीप गांधी, आ. स्नेहलता कोल्हे, आ. बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा संघटनमंत्री प्रकाश चित्ते, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे आदी उपस्थित होते.

बैठकीत अकोले तालुका विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवेदन करताना जालिंदर वाकचौरे व भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, अकोले तालुका हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. ही जागा शिवसेना गेले 35 वर्षे लढवते आहे. मागील निवडणुकीत युती नसताना भाजप तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत शंभर टक्के यश भाजपला मिळाले आहे.

लोकसभा निवडणुकीत जरी तालुक्‍यातून युतीची पीछेहाट झाली असली, तरी खा. सदाशिव लोखंडे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी घेतलेली रोखठोक भूमिका आदिवासी जनतेला मान्य झाली नाही. विधानसभेच्या निवडणुकीत या मताचे गणित बदलेल, असा विश्‍वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात धनगर समाजाच्या मागण्या मान्य करताना आदिवासी समाजाच्या कुठल्याही आरक्षणाला अथवा निधीला धक्का लावला नाही. त्यामुळे आदिवासी समाजात भाजप विषयी सकारात्मकता निर्माण झाली आहे. तसेच मराठा समाजाला 13 टक्के आरक्षण मिळाल्यामुळे या युवकांमध्ये भाजपविषयी आस्था आहे.

भाजपकडून अनेक चांगले उच्चशिक्षित व जनाधार असलेले उमेदवार असून, जनमाणसात त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. भाजप 307 बूथ प्रमुख, 53 शक्तीकेंद्र प्रमुख, 14 गणप्रमुख, 7 गटप्रमुखांची नियुक्ती केली आहे.दहा हजार कार्यकर्ते हे मुख्यमंत्री वॉररूम बरोबर जोडले आहेत. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून सभासद नोंदणी व महिला आघाडीच्या माध्यमातून ‘स्त्रीशक्ती अभियान’ राबविण्यात येणार आहे. यासाठी तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे व रक्षाबंधन अभियान प्रमुख म्हणून महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष रुंभोडी गावच्या सरपंच जयश्री सावंत यांची निवड करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)