राज्य शासनाकडून मंजुरी मिळाल्यास कमी होणार “वेटिंग’

आरटीओच्या ब्रेक टेस्ट व वाहन नोंदणीसाठी सेक्‍टर 6 मधील जागेचा प्रस्ताव
पिंपरी – ब्रेक टेस्ट ट्रॅक आणि वाहन नोंदणी तपासणीसाठी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पुरेशी जागा नसल्याने अनेक वाहने वेटिंगवर आहेत. पिंपरी-चिंचवडच्या मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ब्रेक टेस्ट ट्रॅक बरोबरच पार्किंग व वाहन नोंदणी तपासणीसाठी आवश्‍यक असलेल्या जागेचा प्रश्‍न लवकरच मिटण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत.

यासाठी चिखली येथील सेक्‍टर क्रमांक 6, मधील गट क्रमांक 539 येथे जागेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. राज्य शासनाकडून मंजुरी मिळताच तेथे “आरटीओ’च्या तपासणीची कामे मार्गी लागतील, त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दुजोरा मिळाला आहे. यामुळे राज्य शासनाकडून मंजुरी मिळताच “वेटिंग’ कमी होणार आहे. उपप्रादेशिक कार्यालयातील वाहन तपासणीसह विविध कामे जागेअभावी लांबणीवर पडली आहेत. दोन ब्रेक टेस्ट ट्रॅकची आवश्‍यकता असताना, सद्यस्थितीत एकाच ट्रॅकवर काम पार पाडले जात आहे.

परिणामी, ब्रेक टेस्ट ट्रॅकची अनेक वाहनांची कामे रेंगाळली आहेत. यामुळे वाहनांना दीड ते दोन महिने वेटिंगवर राहावे लागते. यामुळे पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हद्दीतील नागरिकांना वाहन तपासणीसाठी बरेच दिवस वाट बघावी लागत होती. आरटीओ कार्यालयाकडून नवीन जागेसंदर्भात शोध सुरु होता. मध्यंतरी प्राधिकरणाकडे जागेबाबत मागणी करण्यात आली होती. त्यावेळी पाच हेक्‍टरची जागा मिळण्यासाठी प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला होता. मात्र, त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने दुसरी जागा शोधण्याची वेळ आली. दरम्यान, सेक्‍टर क्रमांक 6, गट क्रमांक 534 येथील चार हेक्‍टर गायरान आहे. चिखली येथील “सीएनजी’ पेट्रोपंपाजवळील ती मोक्‍याची जागा “आरटीओ’ला मिळल्यास अनेक प्रश्‍न सुटणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)