…तर कोंढव्यात वाचले असते 15 जणांचे प्राण

महापालिकेचे दुर्लक्ष : पाच वर्षांपूर्वीच होती धोकादायक भिंतीची माहिती


बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी “जात्यात’

पुणे – कोंढवा येथील ऍल्कॉन स्टायलस या इमारतीच्या धोकादायक सीमाभिंतीची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाला सन 2014 मध्येच होती. पालिकेनेही त्याबाबत बांधकाम व्यावसायिक नोटीस बजाविली. मात्र, त्यानंतर गेल्या पाच वर्षांत एकदाही ही भिंत सुरक्षित झाली आहे किंवा नाही, याची कोणतीही खातरजमा न करता अवघ्या दोन आठवड्यांपूर्वीच महापालिकेने या इमारतीस पूर्णत्वाचा दाखला दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कोंढव्यातील इमारतीची सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर पोलिसांकडूनही या घटनेची चौकशी सुरू करण्यात अली असून या बाबतची कागदपत्रे पोलिसांनी महापालिकेकडून मागविली आहेत. त्यामुळे या भिंतीकडे दुर्लक्ष करणे बांधकाम विभागाचे कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना चांगलेच भोवणार असल्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या इमारतीच्या सुरक्षा भिंतीच्या सुरक्षिततेवर प्रश्‍न उपस्थित करत महापालिका प्रशासनाने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला 6 मार्च 2014 मध्ये नोटीस बजावली होती. त्यानंतर त्या व्यावसायिकाने सुरक्षा भिंतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करून तसे पत्र महापालिका प्रशासनाला सादर केले होते. या इमारतीचे बांधकाम गेली काही वर्षे सुरू होते. त्यानंतर महापालिकेने यावर्षी 21जून रोजी या इमारतीस बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. त्यावेळीच भिंतीच्या सुरक्षिततेचा आढावा का घेण्यात आला नाही, असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. या शिवाय, ज्या कुणाल हौसिंग कंपनीच्या बांधकाम मजुरांच्या वसाहतीवर ही भिंत कोसळली, त्या ठिकाणी गेल्या तीन महिन्यांपासून खोदाईचे काम सुरू आहे. या बांधकाम व्यावसायिकाकडूनही 2012 पासून वेळोवेळी सुधारीत बांधकाम प्रस्ताव दाखल केले आहेत. अशा वेळी बांधकाम विभागांच्या कर्मचाऱ्यांकडून साईट व्हिजिटही करण्यात आलेली होती. मात्र, त्यांच्याकडूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. त्यातच, आता पोलिसांनी या दोन्ही बाबींच्या माहितीसह प्रकल्पांची माहिती मागविल्याने महापालिका कर्मचाऱ्यांची अडचण वाढण्याची शक्‍यता आहे.

तर, सहआरोपी करणार…
कोंढवा आणि आंबेगाव येथील सीमाभिंत कोसळल्याच्या घटनेची चौकशी अतिकिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने सुरू केली आहे. या समितीच्या चौकशीत महापालिका अभियंत्यांचा काही हलगर्जीपणा आहे का, याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. समितीच्या अहवालात अभियंत्यांवर ठपका ठेवण्यात आला, तर कोंढवा येथील गुन्ह्यात महापालिकेच्या अभियंत्यांना सहआरोपी करण्याची पावले उचलण्यात येतील, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी केवळ बांधकाम व्यावसायिकच नाही, तर कामात अनियमितता असलेल्या बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई होण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)