बाळासाहेब असते, तर अन्याय झाला नसता -बुचके

हकालपट्टीच्या निर्णयानंतर बुचके रुग्णालयात

जुन्नर -सन 2002पासून जुन्नर तालुक्‍यातील चार विविध जिल्हा परिषद गटांमधून निवडून आलेल्या जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके यांची शिवसेनेने पक्षातून हकालपट्टी केल्यामुळे तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. मी आजपर्यंत शिवसेनेचे प्रामाणिकपणे काम केले असून बाळासाहेब असते तर माझ्यावर अन्याय झाला नसता, अशी उद्विग्न प्रतिक्रिया आशा बुचके यांनी दिली आहे. दरम्यान अनपेक्षित कारवाईमुळे बुचके यांना मानसिक धक्का बसला असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. बुचके यांचा रक्तदाब व रक्तातील साखर वाढल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. सागर शिंदे यांनी दिली.

माझ्याविरुद्ध पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा एखादा तरी पुरावा वरिष्ठांनी दाखवावा, अशी प्रतिक्रिया बुचके यांनी दिली आहे. गेल्या दोन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला अंतर्गत गटबाजीमुळे निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या वीस वर्षांपासून संघटना भक्कम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून यापुढील काळातही जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे त्या म्हणाल्या. येत्या विधानसभेबाबत माझे कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे वाटचाल राहिल. कार्यकर्त्यांशी बोलताना त्या भावुक झाल्या होत्या. जुन्नर तालुक्‍यातील सुमारे 70 ग्रामपंचायती, जुन्नर नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी संस्थांवर बुचके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विजय प्राप्त केला होता.

बुचके यांची विचारपूस करण्यासाठी बुधवारी (दि. 26) दिवसभर तालुक्‍यातील नेते व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, उपाध्यक्ष अशोक घोलप, राष्ट्रवादीचे युवानेते अतुल बेनके, नगराध्यक्ष शाम पांडे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, विघ्नहरचे संचालक संतोष खैरे, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, युवानेते गणेश कवडे आदींसह शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी रुग्णालयात येऊन बुचके यांची भेट घेतली.

शिवसेनेला फटका बसणार?
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कोल्हे यांना जुन्नर तालुक्‍यातून सुमारे 42 हजार मतांची आघाडी मिळाली होती. तसेच आमदार शरद सोनवणे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाला आशा बुचके यांनी जाहीर विरोध दर्शवत राजीनाम्याची धमकी दिली होती. लोकसभेतील पराभव आणि तालुक्‍यातील गटबाजी या निकषांच्या आधारे पक्षाने बुचके यांच्यावर कारवाई केली असावी, असे मानण्यात येत आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची उपनेतेपदी निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नेत्यांवर कारवाई सुरू झाली आहे. बुचके यांच्यावरील हकालपट्टीमुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला फटका बसणार का फायदा होणार, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here