गोवा संघाच्या बचावातील त्रुटींचा फायदा घेण्याचा ब्लास्टर्सचा प्रयत्न

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धा

कोची – हिरो इंडियन सुपर लीगमध्ये आज केरळा ब्लास्टर्सची एफसी गोवा संघाविरुद्ध लढत होत आहे. ब्लास्टर्सला गुणतक्त्‌यातील पिछाडी कमी करण्याची गरज असून गोव्याच्या बचावातील त्रुटींचा फायदा घेण्याचा त्यांचा या सामन्यात प्रयत्न राहील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ब्लास्टर्सला चिवट खेळ करूनही सहा सामन्यांत केवळ एक विजय मिळविता आला आहे. एटीकेविरुद्ध मोसमाच्या सलामीला त्यांनी ही कामगिरी साध्य केला. त्यानंतर मात्र पाच सामन्यांत चार बरोबरी आणि एक पराभव अशी त्यांची कामगिरी झाली आहे. मागील सामन्यात बेंगळुरू एफसीकडून ते हरले.

जिंकण्यासाठी प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक गोल जास्त करावा लागतो, पण डेव्हिड जेम्स यांच्या संघाला गोल करण्यासाठीच झगडावे लागत आहे. त्यासाठी त्यांच्या आघाडी फळीतील खेळाडूंना धडाकेबाज खेळ करणाऱ्या गोव्याविरुद्ध धडाका लावावा लागेल. मिळतील त्या संधींचा त्यांना फायदा उठवावा लागेल.

ब्लास्टर्सचे सहाय्यक प्रशिक्षक थांगबोई सिंगटो यांनी सांगितले की, गोव्याच्या संघाविषयी आम्हाला आदर वाटतो. त्यांचा संघ आक्रमक खेळ करणारा आहे, पण ते गोल पत्करतात हे त्यांचे रेकॉर्ड पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल. आम्हाला संघ म्हणून जिंकायला नक्कीच सुरवात करायला हवी. सिंगटो यांचे मत म्हणजे नवा शोध नाही.

सर्जिओ लॉबेरा यांच्या संघाचे प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त गोल करण्याचे धोरण यशस्वी ठरते आहेत. याचे कारण हा संघ गुणतक्त्‌यात आघाडीवर आहे. त्यांचा गोलफरक सर्वोत्तम असून सर्वाधिक 18 गोल त्यांनी केले आहेत. सामन्यागणिक तीन गोल अशी त्यांची सरासरी आहे. त्यांचा बचाव मात्र डळमळीत आहे आणि तोच ब्लास्टर्सचे लक्ष्य असेल.

लॉबेरा यांनी सांगितले की, आम्ही आक्रमक खेळ करतो याचा अर्थ आम्हाला जास्त धोके पत्करावे लागतात. ब्लास्टर्सला आम्ही थेट प्रतिस्पर्धी मानतो. आमच्याविरुद्ध गोल करणे शक्‍य आहे असे त्यांचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणत असतील तर सामना चांगला होईल. आम्ही त्यांच्यापेक्षा एक गोल जास्त करू शकलो तर मी आनंदी असेन असेही ते यावेळी म्हणाले.

गोव्याचा प्रमुख स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याच्यासाठी दिल्ली डायनॅमोजविरुद्धचा सामना फारसा चांगला ठरला नाही. त्यामुळे तो भरपाई करण्यासाठी व गोल्डन बूटच्या शर्यतीमध्ये आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असेल. सहा गोल व चार ऍसिस्ट अशी कामगिरी आताच त्याच्या खात्यात जमा आहे. एदू बेदिया यंदाच्या मोसमात तुफान फॉर्मात आला आहे.

स्पेनच्या या मध्यरक्षकाने काही जोरदार गोल केले असून ब्लास्टर्सला त्याच्यापासून सावध राहावे लागेल. ह्युगो बौमौस हा सुद्धा उत्तम फॉर्मात आहे. सिंगटो यांनी हे मुद्दे मान्य केले. ते म्हणाले की, गोव्याचा संघ म्हणजे केवळ कोरो नव्हे. त्यांच्याकडे बेदिया आणि बौमौस असे तेवढेच प्रतिभाशाली खेळाडू आहेत. आम्हाला संघ म्हणून गोव्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

लॉबेरा यांच्यासाठी चांगली बातमी म्हणजे ब्रॅंडन फर्नांडीस पुर्णतः तंदुरुस्त झाला आहे. त्याने मागील सामन्यात गोलही केला आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास उंचावला आहे. गोवा भेदक आक्रमण कायम ठेवणार का की ब्लास्टर्स घरच्या मैदानावर पहिला विजय मिळविणार याची उत्सुकता असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)