कार्डिफ – फलंदाजांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने सराव सामन्यात श्रीलंकेचा 87 धावांनी पराभव केला. तत्पूर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने 50 षटकांत 7 बाद 338 धावांची मजल मारत श्रीलंकेसमोर विजयासाठी 339 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेला 42.3 षटकांत सर्वबाद 251 धावांचीच मजल मारता आल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 339 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या श्रीलंकेच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर कुसल परेरा एकही धाव न करता परतला तर थिरिमाने केवळ 10 धावा करून परतल्याने श्रीलंकेची 2 बाद 10 अशी अवस्था झाली. यानंतर करुणारत्ने आणि कुशल मेंडीस यांनी संघाचा डाव सावरला.
मात्र, मेंडीस 37 धावांवर बाद झाल्याने ही जोडी फुटली. यानंतर आलेल्या अँजेलो मॅथ्युजच्या साथीत करुणारत्नेने श्रीलंकेला दिड शतकी मजल मारुन दिल्यानंतर करुणारत्ने 87 धावा करून परतला. यानंतर मॅथ्युजने तिर फलंदाजांना सोबत घेऊन श्रीलंकेची वाटचाल कायम ठेवली मात्र, इतर फलंदाज केवळ हजेरी लावत होते. यावेळी मॅथ्युजही मोठा फटका मारण्याच्या नादात 64 धावा करून बाद झाला.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने वेगवान सुरुवात केली. मात्र, सलामीवीर मर्क्रम 21 धावा करून परतल्यावर आलेल्या फाफ ड्यु प्लेसिस आणि हाशिम आमलाने संघाचा डाव सावरायला सुरुवात केली. दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण करत दुसऱ्या गड्यासाठी 128 धावांची भागीदारी केली. यावेळी आमला 65 तर ड्यु प्लेसिस 88 धावा करून परतल्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये ड्वेन प्रेटोरियस (नाबाद 25) आणि ख्रिस मॉरिस (नाबाद 26) यांनी फटकेबाजी करत अफ्रिकेला 338 धावांची मजल मारुन दिली.