स्थळ – ब्रिस्टल
वेळ – दु. 3.00 वा
ब्रिस्टल – गत काही काळापासुन खराब फॉर्मचा शिकार झालेल्या श्रीलंकेच्या संघासमोर आज विश्वचषक स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघाच्या हृदयाचा ठोका चुकवणारी कामगिरी करणाऱ्या बांगलादेशचे आव्हान असणार आहे.
बांगलादेशच्या संघाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेची सुरूवात दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर आपली एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वात मोठी धावसंख्या उभाकरत केली होती. त्या सामन्यात बांगलादेशने 330 धावा करत दक्षिण आफ्रिकेचा 21 धावांनी पराभव केला.
तर, दुसऱ्या सामन्यात न्युझीलंडच्या संघाकडून अतितटीच्या सामन्यात पराभुत झाल्यानंतर इंग्लंड विरुद्ध मोठा पराभव पत्करावा लागला होता. मात्र, या तिन्ही सामन्यात बांगलादेशच्या संघातील फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत आपल्या प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली होती. यात अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आणि यष्टीरक्षक फलंदाज मुश्फिकुर रहिम यांची फलंदाजी वाखाणन्याजोग होती.
यावेळी बांगलादेशच्या संघाला पहिल्या दोन सामन्यात चांगली सुरूवात करुन देणाऱ्या तमिम इक्बाल आणि सौम्य सरकारला मोठ्या खेळी करण्यात अपयश आल्याने त्यांचा संघ काहिसा पिछाडीवर पडलेला दिसुन आला आहे. तर, शाकिबने आता पर्यंत स्पर्धेतील तिनही सामन्यात चमकदार कामगिरी करत दोन अर्धशतक आणि एका शतक नोंदवत चमकदार कामगिरी करत महत्वाची भुमिका बजावली आहे.
त्यातच बांगलादेशच्या संघाची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांची गोलंदाजी असुन इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्यांनी तब्बल 386 धावांची खैरात वाटप केली होती. या वेळी आजच्या सामन्यात त्यांना आपल्या गोलंदाजांमध्ये सुधारणा करणे गरजेचे असुन गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली तरच त्यांचा संघ विजय मिळवू शकेल.
दुसरीकडे, अंतर्गत कलहामुळे आणि खेळाडूंना सातत्यपुर्ण कामगिरी करण्यात आलेल्या अपयशामुळे गतकाही काळापासुन खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या श्रीलंकेसमोर फलंदाजांचा खराब फॉर्म हीच एकमेव मोठी समस्या असुन केवळ दिमुथ करुणारत्ने आणि कुशल परेरा हे फलंदाज आपल्या फलंदाजीने संघाचा डाव सावरताना दिसुन येत आहेत. त्यातच अष्टपैलू खेळाडू आणि मधल्या फळीतील महत्वाचा समजला जाणारा अँजेलो मॅथ्युजहा सरस कामगिरी करण्यात सातत्याने अपयशी होत असुन श्रीलंकेच्या संघाला विश्वचषक स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखायचे असेल तर मॅथ्युजला आपल्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.
प्रतिस्पर्धी संघ –
बांगलादेश – मशरफे मोर्तझा (कर्णधार), लिट्टन दास (यष्टीरक्षक), तमीम इक्बाल, सौम्य सरकार, मुशफकीर रहीम, शकीब अल हसन, अबू जायेद, महमदुल्लाह, मेहंदी हसन मिर्झा, मोहम्मद मिथुन, मोहम्मद सैफुद्दीन, मोसादेक हुसैन, मुस्ताफिझूर रेहमान, रुबेल हुसैन, सब्बीर रहमान.
श्रीलंका – दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), धनंजय डि सिल्व्हा, नुवान प्रदीप, अविष्का फर्नांडो, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल मेंडिस, जीवन मेंडिस, कुशल परेरा, थिसारा परेरा, मिलिंदा सिरीवर्धने, लहिरु थिरिमाने, इसरु उडाना, जेफ्री व्हॅंडरसे.