भारतीय महिलांचे आव्हान संपुष्टात

इंग्लंडचा अंतिम फेरीत धडाक्‍यात प्रवेश

अँटिग्वा – हिथर नाईट आणि किर्स्टी गॉर्डनयांच्या भेदक गोलंदाजी नंतर ऍमी जोन्स व नताली स्किवर यांनी केलेल्या 92 धावांच्या भागीदारीच्या जोरावर टी-20 महिला विश्‍वचषकाच्या उपांत्य फेरीतील सामन्यात इंग्लंडने भारतावर 8 गडी राखून विजय मिळवला. या पराभवामुळे भारतीय महिला संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. विश्‍वचषक स्पर्धेतील अंतिम सामना आता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघादरम्यान होणार आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची भारतीय महिला संघाचा निर्णय चांगलाच अंगलट आला. भारतीय महिला संघाचा डाव 19.3 षटकांत 112 धावांमध्येच संपुष्टात आला. त्यामुळे 113 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या महिला संघाने हे आव्हान 17.1 षटकांत केवळ दोन गडी गमावून 116 धावा करत पुर्ण केले. याविजयासह त्यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे.

यावेळी 113 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यास उतरलेल्या इंग्लंडच्या महिला संघाची सुरुवात खराब झाली. त्यांची सलामीवीर टॅमी ब्युमोंट दुसऱ्याच षटकांत परतली. तर, दुसरी सलामीवीर डॅनिएली वॅटदेखिल केवळ आठ धावा करुन परतली. त्यामुळे त्यांची 4.5 षटकांत 2 बाद 24 अशी अवस्था झाली होती. मात्र त्यानंतर त्यांची यष्टीरक्षक फलंदाज ऍमी जोन्स आणि नतालि स्किव्हरयांनी सावध फलंदाजी करत संघाचा डाव सावरायला सुरुवात केली.

यावेळी दोघीनींही आपापली अर्धशतके पूर्ण करताना 12.2 षटकांत 92 धावांची भागिदारी करत संघाच्या विजयावर शिक्‍का मोर्तब केला. यावेळी ऍमी जोन्सने नाबाद 53 धावांची खेळी केली. तर, नताली स्किव्हरने नाबाद 52 धावा करत तिला सुरेख साथ दिली.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारतीय सलामीवीर जोडीने काही प्रमाणात सार्थ ठरवला. स्मृती मंधाना आणि तानिया भाटीया जोडीने पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. यावेळी मंधाना 34 धावा करुन माघारी परतल्यानंतर, काही वेळाने तानिया भाटीयाही 11 धावांवर बाद झाली.

यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जच्या साथीने भारताचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली. मात्र रॉड्रीग्ज माघारी परतल्यानंतर भारताच्या डावाला गळती लागली. भारताच्या मधल्या फळीतल्या सर्व फलंदाज एकामागोमाग एक विकेट फेकत राहिल्या.

दुसऱ्या बाजूने कर्णधार हरमनप्रीत कौरने फटकेबाजी करत भारताच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र लागोपाठ विकेट जाण्याचे सत्र सुरु राहिल्यामुळे तीदेखील मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी परतली. भारताकडून स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रीग्ज, तानिया भाटीया आणि हरमनप्रीत कौर या 4 फलंदाजांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली. इतर सर्व फलंदाजांनी निराशा केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)