भ्रष्टाचार रोखण्यासाठी आयसीसीचे पाऊल
लंडन – इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रथमच प्रत्येक संघासोबत एक भ्रष्टाचारविरोधी अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आलेला आहे. या स्पर्धेत भ्रष्टाचाराला आळा घातला जावा या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रत्येक संघासोबत एक अधिकारी असेल. तो संघासोबत हॉटेलवर राहील व त्यांच्यासोबतच प्रवास करील, असे आयसीसीने सांगितले आहे. या स्पर्धेच्या प्रारंभी होणाऱ्या सराव सामन्यांपासून हे अधिकारी प्रत्येक संघासोबत असतील.
याआधी आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी पथक प्रत्येक स्पर्धास्थळी उपस्थित असे. स्पर्धेदरम्यान या पथकाशी संघांना संपर्क ठेवावा लागे. आता प्रत्येक संघासोबत असा अधिकारी असेल. खेळाडूंबरोबरच तो त्यांच्या हॉटेलमध्ये थांबेल आणि त्यांच्यासोबतच सराव सामने आणि मुख्य सामन्यांमध्येही असेल. विश्वचषक स्पर्धा फिक्सिंग आणि भ्रष्टाचारामुक्त व्हावी या उद्देशाने आयसीसीने महत्वाचे पाऊल उचलले आहे.
खेळाडू आणि भ्रष्टाचार विभाग यांच्यातील संबंध दृढ व्हावेत हादेखील यामागचा उद्देश आहे. या अधिकाऱ्यामुळे सामन्यात फिक्सिंग किंवा भ्रष्टाचार करू इच्छिणाऱ्या व्यक्तीवर नजर ठेवणे शक्य होणार आहे असेही आयसीसीने यावेळी नमूद केले आहे.