मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही : शरद पवार

माझ्या नावाची चर्चाच नको! 
मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक तर्कवितर्क काढले जात होते. अखेर याबाबत खुद्द शरद पवार यांनीच भाष्य करीत आपल्या निवडणूक लढवण्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी कुठलीही निवडणूक लढविणार नसून उगाच माझ्या नावाची चर्चा करू नका, असे स्पष्टपणे पवारांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना बजावले आहे.
पाच राज्यांतील निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर महाराष्ट्रातही निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज मुंबईत राष्ट्रवादी भवन येथे 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जागांचा आढावा घेण्याबाबत मतदारसंघनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. ही बैठक दोन दिवस सुरू राहणार आहे.
शरद पवारांनी 2014 मध्येच कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. ते जनतेमधून कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. पुणे लोकसभा मतदार संघातून पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी धरला होता. तसे सूतोवाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केले होते. पुणे लोकसभा मतदारसंघ गेली अनेक वर्षे कॉंग्रेसकडे आहे. मात्र मागच्या निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार पराभूत झाला. येत्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी पुण्यातून लढावे, असा आग्रह पक्षातून धरला जात होता. मात्र, पवारांनी यावर आपली भूमिका स्पष्ट करीत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
पार्थसाठी पवार अनुकूल नाहीत… 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे आगामी लोकसभा निवडणूक मावळ मतदारसंघातून लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून मीडियात रंगली होती. मात्र, पार्थच्या उमेदवारीसाठी खुद्द शरद पवार अनुकूल नसल्याची माहिती समोर आली आहे. पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली, तर पक्ष बांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार?असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. पवारांच्या या प्रश्नावर पार्थचे वडील अजित पवारांनी मात्र मौन पाळले आहे. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
25 जागांचा प्रस्ताव 
आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही विरोधी पक्षांनी आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. काही करून आगामी निवडणुकीत दोन आकडी जागा जिंकण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेसकडे 25 जागांची मागणी केल्याचे समजते. मात्र राष्ट्रवादीच्या या प्रस्तावाला कॉंग्रेस कितपत प्रतिसाद देते यावर आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)