यंदा पवार कुटुंबातून मीच निवडणूक लढविणार – शरद पवार

‘एमआयटी’मध्ये छ. शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्याचे अनावरण

लोणी काळभोर – आगामी लोकसभेची निवडणूक अजित पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार, लढविणार नाहीत. यंदाच्या निवडणुकीत पवार कुटुंबातून फक्त मीच निवडणूक लढविणार आहे, अशी स्पष्टोक्‍ती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे मावळातून पार्थ पवार निवडणूक लढविण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

माईर्स एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठाच्या राजबाग, लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्‍नॉलॉजी विद्यापीठाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार बाबुराव पाचर्णे, एमआयटीचे संस्थापक विश्‍वनाथ कराड, नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू विजय भटकर, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष मंगेश कराड, एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड आदी मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले की, हा जगातील सर्वांत मोठा घुमट आहे. या घुमटाच्या आतमध्ये जगातील 54 तत्वज्ञ, संत, शास्त्रज्ञ यांचे पुतळे आहेत. या संस्थेच्या प्रांगणात छत्रपतींच्या पुतळ्याची गरज होती. हा पुतळा सर्वांना प्रेरणा देईल. घुमटामध्ये उभारलेले पुतळे हे एकाच विचाराशी बांधीलकी असणाऱ्यांचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे एकाच विचाराचे बांधीलकी सांगणारे नव्हते. त्यांचे विचार सर्वसमावेशक होते. त्यामुळे बंदिस्त घुमटामध्ये छत्रपतींचा पुतळा बसवला नाही हे योग्यच केले आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत.

महाराजांनी कधीच जातपात मानली नाही. म्हणूनच त्यांच्या सैन्यदलात उच्च पदावर मुस्लिम सैनिक काम करीत होते. आज काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन काम करीत आहेत; परंतु काही जण छत्रपतींच्या विचारांना संकुचित पद्धतीने मांडत आहेत. हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी प्रतारणा करत आहेत. आगामी काळात छत्रपतींच्या विचारांचा समृद्ध वारसा आपल्या देशाची प्रगती करू शकतो असे शरद पवार यांनी नमूद केले.

… म्हणून राजे महान
भारतात हजारो राजे महाराजे होऊन गेले, प्रत्येकाच्या राज्याला आपापल्या घराण्याचे नाव होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे नाव हिंदवी स्वराज्य तसेच रयतेचे राज्य असे होते. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे होते, असे शरद पवार यांनी नमूद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)