आपण तिच्याबद्दल प्रभावित झालो होतो, पण… – शोएब 

क्रिकेटपटू आणि फिल्मी ऍक्‍ट्रेस यांच्यातील रिलेशनशीपच्या बातम्या तर आपण नेहमीच ऐकत असतो. त्यांच्यातील ऑफस्क्रीन केमिस्ट्रीच्या गॉसिप गप्पाही खूप होत असतात. पण क्‍वचितच अशा गॉसिपला स्पष्ट शब्दात फेटाळले जाते. “आम्ही केवळ चांगले मित्र आहोत.’ असे ठराविक साच्याचे उत्तरच प्रत्येकवेळी दिले जात असते.

असेच एक समीकरण काही दिवसांपूर्वी जोडले जात होते. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा सोनाली बेंद्रेवर फिदा झाला आहे आणि त्याने म्हणे तिला किडनॅप करून तिच्याबरोबर लग्न करायचेही ठरवले आहे, अशी अफवा पसरली होती. शोएबने ही अफवा फेटाळून लावली आहे.

“कोण म्हणतेय की माझे सोनाली बेंद्रेवर प्रेम आहे. मी तिला पळवून नेण्याचा विचार करतो आहे.’ असा सवालच त्याने विचारला. मी सोनालीला कधीही भेटलेलो नाही. तिच्या एखाद दुसऱ्या सिनेमामध्ये कदाचित तिला बघितले असेल. पण मी काही तिचा फॅन नाही, असेही शोएब म्हणाला.

सोनाली आता नुकतीच कॅन्सरवरील उपचार घेऊन भारतात परतली आहे. तिच्या आजारपणाच्या काळात अख्ख्या बॉलिवूडने तिला पाठिंबा आणि शुभेच्छा दिल्या होत्या. त्याकाळात तिच्याबाबतच्या बातम्या नेहमीच प्रसिद्ध होत होत्या. त्यामुळेच शोएबला तिच्याबाबत सविस्तर माहिती झाली. कॅन्सरवरील उपचारादरम्यान तिने दाखवलेल्या धैर्यामुळेच आपण तिच्याबद्दल प्रभावित झालो, असेही शोएबने म्हटले आहे.

युवराज सिंह, सोनाली बेंद्रे, इरफान खान आणि ऋषी कपूर या चौघांनी कॅन्सरवर यशस्वीपणे मात केली आहे. इरफान खानने तर आता “इंग्लिश मीडियम’चे शुटिंगही सुरू केले आहे. काही महिन्यात ऋषी कपूर देखील भारतात परत येणार आहेत. सोनालीही आता फिट ऍन्ड फाईन आहे. युवराजने आता निवृत्तीनंतर कॅन्सर रुग्णांसाठीच काम करायचे ठरवले आहे. त्यांच्या धैर्याचे सगळ्यांनाच कौतुक वाटायला हवे. शोएबला जर सोनालीबाबत असे कौतुक वाटले तर त्यात गैर काय असावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)