मी भोगलेले दु:ख कुणाच्याही वाट्याला येता कामा नये!

– एकनाथ खडसेंनी व्यक्त केली भावना

मुंबई – मी गेल्या चाळीस वर्षांत एकही निवडणूक हरलेलो नाही. चाळीस वर्षांच्या राजकीय आयुष्यात माझ्यावर कधी आरोपही झाले नाहीत. आता आरोप झाले ते देखील विधानसभेत न होता बाहेरच्या व्यक्तीने केले. याच्या मला फार वेदना होत आहेत. पण माझ्यावर जी वेळ आली, मी जे दुःख भोगावे लागले ते कोणाच्याही वाट्याला येता कामा नये, अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज सभागृहात भावनांना वाट मोकळी करून दिली.

मला डाग घेऊन जायचे नाही!
माझ्यावर ज्यांनी आरोप केले त्यांनी कोणतेही पुरावे दिले नाहीत. पुराव्याशिवाय आरोप करणे म्हणजे एकाद्याचे आयुष्य उद्ध्‌वस्त करण्यासारखे असते. पुरवे असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी. पण कोणी खोटे आरोप करीत असेल त्यालाही कठोर शिक्षा व्हायला हवी. त्यासाठी सभागृहाने कायदा करायला हवा. कारण माझ्यावर झालेल्या आरोपांचे डाग घेऊन मला जायचे नाही. माझ्या वाट्याला आले ते इतरांना भोगावे लागता कामा नये, असेही भावनिक आवाहन खडसे यांनी केले. 

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत एकनाथ खडसे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. दाउदच्या बायकोशी माझे संभाषण होत असल्याचा आरोप झाला. कोणीतरी हॅकर मनीष भंगाळेला पुढे केले. एटीएसपासून सगळयांनी चौकशी केली. पण त्यात काहीच तथ्य आढळले नाही. आज हा मनीष भंगाळे कुठे आहे, हयात आहे की मेला हे कोणालाही माहिती नाही. जणू काही माझ्यावर आरोप करण्यासाठीच मनीष भंगाळेने जन्म घेतला आहे का, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.

माझ्यानंतर माझ्या जावयावरही आरोप झाले. जावयाने लिमोझीन गाडी घेतल्याचा आरोप झाला. त्याने 2012 साली ती गाडी घेतली होती आणि ते 2013 मध्ये माझे जावई झाले. पण ती मोडीफाईड कार होती. ओरिजनल लिमोझीन नव्हतीच. पण माझे कोणीच ऐकले नाही.

माझ्याविरोधात जे छापायचे ते छापून आले. त्यानंतर माझ्यावर जमिन गैरव्यवहाराचा आरोप झाला. ती जमिन एमआयडीसीची नव्हतीच. माझा त्या जमिनीशी संबंधही नव्हता. माझ्या पत्नीने ती जमिन घेतली होती. याप्रकरणी झोटिंग समिती नेमली. आयकर खात्याच्या माझ्यावर धाडी देखील पडल्या. पण अपसंपदा नसल्याचाच अहवाल आयकर खात्याने दिला. माझ्या वडिलोपार्जित शेती शिवाय माझ्या नावावर कोणताही उद्योग नाही. शैक्षणिक संस्था,मेडिकल कॉलेज नाही असेही खडसे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)