Prabhat blog : मला निबंधातून भेटलेले पु.ल.

मी नववीमध्ये असताना मला शाळेत ” माझे आवडते लेखक” या विषयावर निबंध लिहून आणायला सांगितला होता. तेंव्हा माझे आवडते लेखक कोण असा प्रश्न कोणी विचारला तर माझी अवस्था देखील प्रश्नार्थक चिन्हासारखी व्हायची. त्यामुळे आता निबंध कोणत्या लेखकावर लिहायचा  हा माझ्यासमोर पडलेला मोठा प्रश्न होता. मग मी मैत्रीणीच्या सल्ल्यानुसार पूर्ण निबंध नवनीत गाईडमधून कॉपी करण्याच ठरवलं. माझे आवडते लेखक पु.ल देशपांडे हा निबंध मी चक्क कॉपी करून लिहिला आणि अशी मला पु.लं.ची ओळख झाली. त्यामुळे कॉपी करणं सुद्धा माझ्यासाठी फायद्याचे ठरले. कारण कॉपी करताना पु.ल डोळ्यासमोरून जात होते. नंतर त्यांची पुस्तके माझी सोबती झाले. आणी माझ्या मनाचा एक कप्पा कायमचा व्यापून गेला. त्यामुळे थोडं पु.ल विषयी व्यक्त होत आहे…

पु.ल.म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व. पु.ल. हे लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक, दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. पु.लं.च्या कथेतील प्रत्येक पात्र वाचकाला भुरळ घालणार नाही तर नवलचं .पुलंनी जवळपास ४० पुस्तके लिहिली आहेत. असा मी असामी , बटाट्याची चाळ, नस्ती उठाठेव, व्यक्ती आणि वल्ली, खोगीरभरती, पुरचुंडी,  गोळाबेरीज, हसवणूक ही त्यांची पुस्तके फक्त गाजली नाहीत तर काहींच्या आवृत्त्यांचेही विक्रम झाले आहेत. १९४८ साली पु.ल.देशपांडे यांनी “तुका म्हणे आता” हे नाटक आणि बिचारे सौभद्र हे प्रहसन लिहिले. तसेच तुझं आहे तुझपाशी, सुंदर मी होणार, फुलराणी, अमलदार, वार्यावरची वरात, तीन पैशाचा तमाशा, नवे गोकुळ, वटवट वटवट ही काही नाटकेही गाजली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पु.लं.ना प्रवासादरम्यान आलेले अनुभव त्यांनी जावे त्यांच्या देशा, पूर्वरग, अपूर्वाई, वंगचित्रे या प्रवासवर्णनांमध्ये अत्यंत मजेदारपणे लिहिले आहेत. NCPA च्या रंगमंचावर पु.ल.देशपांडे यांनी देवगाणी, बैठकीची लावणी, दोन पिढ्यांची गायकी असे काही अनोखे कार्यक्रम सादर केले. पु.ल.भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली, कानडी येत असल्याने ते त्या त्या समाजातील लोकांमध्ये सहज मिसळत. त्यांचे जगण्यावर विलक्षण प्रेम होते हे त्यांच्या लिखाणातून स्पष्ट होते. लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु.ल.त्या लोकांच्या नकला करायचे.

पू.लं.नी फक्त लिखाणातच नाही तर आकाशवाणी दूरदर्शन व चित्रपटातही लक्षणीय कार्य केले आहे. १९४७ ते १९५४ या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये आणि चित्रपटांसाठी काम केले. वंदे मातरम्‌, दूधभात‘ आणि गुळाचा गणपती या चित्रपटांत त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे होते. पु.ल.देशपांडे यांचा देवबाप्पा प्रसिद्ध झाला व त्यातील ’’नाच रे मोरा’’ हे गाणे अनेक दशके प्रसिद्धीत राहिले. १९५८मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर “मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन” या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९ मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.

पु.ल हे एक अजब-गजब रसायनच होते. ते कथेमधल्या एखाद्या पात्रामधून जितकं हसवत तितकीच त्या पात्राविषयी आपल्या मनात आपुलकीही निर्माण करत. रोजच्या जगण्यातली, अनुभवलेली पात्रे त्यांच्या स्वभाव-वैशिष्ट्यांसह शब्दांमधून पु.ल व्यक्त करत. पु.ल म्हणतात, “शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य , शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल”.  पु.लं.विषयी एवढंच म्हणावसं वाटतं की अशी व्यक्ती पुन्हा होणे नाही.

मयुरी विजया रामदास वाशिंबे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)