मी इतरांच्या मुलांचेही लाड करतो! – उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना टोला

– शिवसेनेची यादी दोन दिवसांत जाहीर होणार

मुंबई – शिवसेना हा पक्ष सर्वसामान्यांसाठी आहे. त्यामुळे इतरांची मुलं केवळ धुणीभांडीसाठी वापरणे हा शिवसेनेचा विचार कधीच असू शकत नाही. म्हणूनच मी माझ्याच नव्हे तर इतरांच्या मुलांचेही लाड करतो, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. शिवसेना-भाजपाची युती झाली असून आता कोणताही दगाफटका होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे यावेळी निवडणूकींच्या रिंगणात नाही
डॉ.सुजय विखे-पाटील यांना भाजप लोकसभेच्या रिंगणात उतरवणार असले तरी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याबरोबरच आदित्य ठाकरे देखील लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा दोन दिवस सुरू आहे. त्याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर कधीही कोणते बंधन टाकले नव्हते. त्यानुसार मी देखील आदित्यवर कोणते बंधन टाकलेले नाही. त्यामुळे निवडणूक लढवायची की नाही याचा सर्वस्वी निर्णय तोच घेईल. पण यावेळी ही निवडणूक तरी तो लढणार नाही.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते व कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार यांनी निवडणूकीतून घेतलेली माघार तसेच मोदी यांच्याविषयी केलेल्या भाकिताबाबत पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, जे काही घडते आहे ते शरद पवार यांच्या नितीला शोभेल असेच घडत आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, मात्र ते जे बोलतात त्याच्या नेमके उलटे समजायचे असते. शरद पवार हे अष्टपैलू नेते आहेत हे माहिती होते, पण ज्योतिष म्हणून त्यांची अद्याप ओळख झालेली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

युतीत दगाफटका होणार नाही
जालन्याच्या जागेविषयी उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, भाजपाचे तेथील खासदार व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात वाद आहे. यासंदर्भात ते दोघेही भेटणार आहेत. त्यामुळे आता कोणताही दगाफटका होणार नाही. दोघांना समोरासमोर बसवून हा वाद आपण सोडविणार आहोत. पण युतीत कोणी आता मिठाचा खडा टाकणार नाही. शिवसेना-भाजप युती सर्वच्या सर्व जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रचाराचा आराखडा तयार करण्यात आला आहे. निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली असून बैठकीची ही पहिली फेरी आहे. उमेदवारांची यादीही लवकरात लवकर येत्या एक-दोन दिवसांतही जाहीर केली जाईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)