मंदिरांमध्ये जाण्यासाठी मला भाजपच्या सर्टिफिकेटची गरज नाही : राहुल गांधी

भाजपच्या हिंदुत्ववादापेक्षा हिंदुईझम अधिक महत्वाचा 

इंदोर –
मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी मला भाजपच्या सर्टिफिकेटची गरज नाही. भाजपला हिंदुत्वाचा जो अर्थ समजला आहे त्यापेक्षा मला त्याचा अर्थ अधिक समजला असून प्रत्येक धर्माचा आदर करणारा मी एक राष्ट्रवादी नेता आहे अशा शब्दात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला फटकारले आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की मी हिंदुत्ववादी नेता नाही तर राष्ट्रवादी नेता आहे. मी केवळ हिंदुच नव्हे तर प्रत्येक धर्माचा, प्रत्येक जातीचा, प्रत्येक वर्गाचा आणि प्रत्येक भाषेचा मी नेता आहे असे मी स्वत:ला मानतो.

राहुल गांधी यांच्या मंदिर भेटीवर टीका करताना भाजपने काल त्यांच्या हिंदुत्ववादी भुमीकेवर फॅन्सी ड्रेस हिंदुईझम असा शब्दप्रयोग करून टीका केली होती. देशातील मंदिरे ही केवळ संघ आणि भाजपचीच मालमत्ता आहे काय असा सवालही त्यांनी केला.ते म्हणाले की मोदी किंवा अमित शहा हे जेव्हा एखाद्या मंदिराच्या प्रथेप्रमाणे वेषभुषा करून तेथे दर्शनाला जातात तेव्हा त्यांच्या पोषाखाविषयी भाजपचे नेते काही बोलत नाहींत पण मी, ज्योतिरादित्य शिंदे किंवा कमलनाथ जेव्हा एखाद्या मंदिरातील प्रथेनुसार तेथे वेष परिधान करून जातो त्यावेळी मात्र त्यांना त्याची हिंदुत्वाचा फॅन्सी ड्रेस अशी तुलना करावीशी वाटते असा आक्षेप त्यांनी घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उजैन येथील महाकालेश्‍वर मंदिरात दर्शनाला जाताना राहुल गांधी हे तेथे मंदिराच्या परंपरेनुसार सोवळे धोतर नेसून तेथे गेले होते त्यावर भाजपने टिका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांनी वरील विधाने केली. जानवेधारी राहुल गांधी यांनी त्यांचे गोत्र कोणते ते सांगावे असे आव्हानही भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी त्यांना दिले होते. जेव्हा मला मंदिरात जावेसे वाटेल आणि तेथे प्रार्थना कराविशी वाटेल तेव्हा मी मंदिरात जाईन. त्यासाठी मला भाजपच्या सर्टिफिकेटची गरज नाही असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. हिंदुईझम आणि हिंदुत्व या दोन भिन्न व्याख्या आहेत.

हिंदुईझम हा उदार, पुरोगामी विचार आहे जो दुसऱ्याचा सन्मान करण्यास आपल्याला शिकवतो आणि भाजपचे हिंदुत्व हे द्वेषमुलक, असुरक्षितता आणि लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण करणारी संकल्पना आहे असे ते म्हणाले. भाजप हिंदुत्वावर आपली मालकी दाखवतो. पण हिंदुईझम वर कोणालाही आपली मालकी सांगता येणार नाही कॉंग्रेस पक्ष हिंदुत्वावर नाही तर हिंदुईझमवर विश्‍वास ठेवणारा पक्ष आहे असेही त्यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)