मी मुंबईकरांच्या मृत्यूचा पूल बोलतोय…!

मी ढासळतो, कोसळतो, पडतो. त्या क्षणी हे असं घडावं. हे मला कधीच वाटत नाही. माझं मला स्व-अस्तित्व संपल्याचही दुःख नसतं. मी माझ्या मूळ रुपापासून नष्ट होत असतो. तेव्हा माझा देहही समजून जातो की, मी आता पडणार आहे. हे सर्व मला कळत असतं. परंतु ज्यांनी मला जे जे साहित्य वापरून बांधलं. ज्यांच्यावर माझ्या संवर्धनाची जबाबदारी आहे. ते माझे मालक सत्तेतील प्रशासन माझ्याकड़े कानाडोळाच करीत असतात. मी दुर्लक्षित झालो तरी मला काहीच दुःख वाटत नाही. मी संपतो याचाही कोणताही गर्व माझ्याकडे नसतो. परंतु जेव्हा माझ्या अंगावरुन ये जा करणारे हजारो मुंबईकर दररोज दिसतात ना तेव्हा मी स्वत:च घाबरून जातो की, कित्येक मुंबई कर यांची जबाबदारी ही माझ्यावर अवलंबून आहे. ये जा करणारा मुंबई कर असो की परप्रांतीय असो माझ्या कडे कोणताच भेद भाव नसतो.

संरक्षणाचा विचार येतो तेव्हा माझं मलाच समजून जातं की हे सर्व माझं कुटुंब आहे.जोपर्यंत मला पेलता येईल तोपर्यंत मी पूर्णपणे ताकदीनिशी पेलण्याचा प्रयत्न करीत असतो. ढासळणाऱ्या अवस्थेत वाटतं की मी माझ्यातच पुन्हा नव्याने जीव ओतावा आणि पहिल्यासारख बनावं.पण ते कदापी शक्‍यच नसतं. कारण मी स्वत: मजबूतीला जोड़नारा फेव्हिकॉल नाही ना मला दुःस्थितीत आणण्याचे काम हे मला कमी बजेट मध्ये बनविलेल्या माझ्या मालकाचेच असते.

माझ्या अंगा खांद्यावरुन एक दिलाने गर्दीतून मार्ग काढीत जीवनाचा संघर्ष करणारे सर्व जाती धर्माचे, माझे पादचारी मुंबईकर पायपीट करताना दिसतात. तेव्हा माझ्यावर त्यांच्या जीवाला सांभाळण्याची खुप मोठी जबाबदारी येऊन ठेपत असते. माझ्या दररोजच्या लाभत असलेल्या सहवासाने प्रत्येकांमध्ये मी प्रत्येकाच्या पाठीशी असल्याचे ते सर्वजण आपण सुरक्षित असल्याचे गणित बाळगुण असतात. हेच ते निर्माण झालेले मानवतेच्या रक्षणाचं नातं प्रत्येक मुंबई कर यांमध्ये दिसत असते. मी नाही पडणार म्हणुन कित्येक मुंबईकर माझ्यावर विश्‍वास ठेवून दररोजच्या घाई गडबडीने पायपीट करीत असतात. गर्दीत चालणारा प्रत्येक मुंबईकर हा जीवनाचा संघर्ष करताना धडपडतोय. कामावर जाण्याच्या गडबडी बरोबरच घरच्या ओढीने काम संपताच कुटुंबाच्या काळजीने ही घरी जाणारे मुंबईकर भागम भाग अशाच अवस्थेत दिसत असतात. माझ्या वर विश्‍वास ठेवणारी ही मुंबईकर मंडळी माझ्या तुटण्याने, कोसळल्याने, पडल्याने क्षणार्धात माझ्या कडून साऱ्या मुंबईकरांचा विश्‍वासघात होतो आहे. तेव्हा माझ्या ही अंगातील त्राण निघुन गेलेला असतो. हे माझ्या मालकाने का समजून घेऊ नये. मुंबईकर माझ्या दुरुस्तीची मागणी करतात. पण माझ्या दुरुस्तीचे टेंडर ही पेंडिंग वर पडलेले असते.ऑडिट ही केले जाते.परंतु चांगला दर्जा आहे. असे सांगून ही मी ढासळतोच.म्हणजेच रिपोर्ट चे ही तीन तेरा वाजले जातात. मग प्रत्येक ढासळलेल्या जागी राजकारणाचे फवारे उडतात. चांगल्या स्थितीत असून ही मी कोसळतोच कसा काय? याचाच अर्थ कुछ तो गोलमाल है, अशी संशयाला जागा उरते. अन माझ्यावरुन राजकारणाला सुरुवातही होते.

प्रत्येक कोसळलेल्या जागी निष्पाप मुंबईकर यांचा जीव संपतोय. माझ्या मुळे बळी गेलेल्या व्यक्तीच्या नावे सरकारी दप्तरांतून लाखो रुपयांची घोषणा होते आहे. बघितले ना जीवांची किंमत ही सत्तेवाल्यांकडून पैशातून मोजली जाते आहे. म्हणुन संताप खुप येतो की, गेलेला माणूस हा पैसा दिल्याने परत येणार आहे का? हा मला च सवाल करावासा वाटतो आहे. कारण मी ही प्रत्येक मृत्युस स्वतःला सारखाच जबाबदार धरतो आहे. माझ्या देहा कडे या मस्तावलेल्या सत्तेकडून का दुर्लक्षित केले जाते आहे? कमीशन वजा करीत मी किती शिल्लक पैशांमध्ये बनतोय हे ही समजेना झाले आहे. घोषणेचा पैसा हा गंजलेल्या प्रशासनाने गंजत चाललेल्या माझ्या जीवांत अगोदरच टाकला असता तर ही मुंबई करांची अपघाताने भेदरलेली मने पाहायला मिळाली नसती. अनेकांचे जीवही गेले नसते. आज तुमच्या मुळेच माझी बदनामी होते आहे. मी मुंबईकरांच्या सुरक्षिततेचा पुल नसुन मृत्युचाच पुल बनतो आहे. ब्रिटिश होते तेव्हा बरे होते.

माझ्या जगण्याची शाश्‍वती तरी होती. माझे आयुष्य किती हे ही सांगून मोकळे व्हायचे. पण हल्ली आज मी बांधलो गेलो तर उद्या पडेन की काय याचीच मला भीती वाटत असते. सत्तेतील प्रशासक हो विकासाची गंगा वाहणारी मेट्रो ट्रेन मुंबईकर यांना नाही मिळाली तरी चालेल पण प्रत्येक ठिकाणी ये जा करणाऱ्या माझ्या देहाला मजबूतीचा जोड़ देणारा फेव्हिकॉल तुमच्या सक्षम निर्णयातुन जोडण्याचे काम करा. कारण जर मी मजबूतीत असेल तरच मुंबई कर ही सुरक्षित राहणार आहेत आणि तुम्ही ही मुंबईकर यांच्यामुळेचच सत्तेत आहांत. हे ही तुम्ही विसरता कामा नये.

– सुशील सुदर्शन गायकवाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)