नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक निकालात भाजपला अपेक्षीत यश न मिळाल्यास आणि भाजपला सरकार स्थापनेसाठी अन्य पक्षांची मदत घेण्याची वेळ आल्यास मोदींच्या ऐवजी नितीन गडकरी हेच पंतप्रधान होऊ शकतात असे भाकीत आज अनेक जण वर्तवताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एका दूरचित्रवाणीवाहिनीशी बोलताना गडकरी यांनी म्हटले आहे की पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील मी डार्क हॉर्स नाही, मला पंतप्रधानपदाची कोणतीही महत्वाकांक्षा नाही.
नरेंद्र मोदी हे आमचे पंतप्रधान आहेत आणि तेच या पदावर कायम राहतील असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला पुरेसे बहुमत निश्चीत मिळेल आणि मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील असेही त्यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केले. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की जरी भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले तरी केंद्रातील सरकार हे एनडीएचे सरकार असेल त्यात सर्व घटक पक्षांना प्रतिनिधीत्व दिले जाईल. भाजपला सत्ता कशी मिळू शकते असा प्रश्न विचारता ते म्हणाले की यावेळी आम्हाला ओडिशा, केरळ, आणि पश्चिम बंगाल मध्ये जादा जागा मिळतील. आणि उत्तरप्रदेशातही तुम्ही म्हणता तशी स्थिती नाही तेथेही भाजप चांगली कामगीरी करू शकतो असे ते म्हणाले.
राजकारणात नेहमीच दोन अधिक दोन चार होत नसते तर कधी तरी तीनही होऊ शकते. त्यामुळे बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी एकत्र आली तरी उत्तरप्रदेशात त्यांच्या जागा वाढतील आणि आमच्या घटतील असे भाकीत करता येत नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले.