हुसेन करंडक हॉकी स्पर्धा : मुंबई कस्टमला विजेतेपद

पुणे – धारदार आक्रमणास भक्कम बचावाची सुरेख जोड देत मुंबई कस्टम संघाने हुसेन शेख करंडक अखिल भारतीय हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी स्पोट्‌स ऍथॉरिटी ऑफ गुजरात संघाचा 3-1 असा पराभव केला.
नेहरुनगर पिंरी येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सामन्याला वेगवान सुरुवात करताना साकिर हुसेन याने आठव्याच मिनिटाला मुंबई कस्टम संघाला आघाडीवर नेले. त्याने पहिल्याच पेनल्टी कॉर्नरद्वारा हा गोल केला. त्यानंतर त्यांनी सातत्यने चाली रचून सामन्यावर नियंत्रण ठेवले होते. मध्यंतराला काही मिनिटे शिल्लक असताना ध्रुवील पटेल याने गुजरात संघाला बरोबरी साधून दिली.

अनुभवी राहुल सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या मुंबई कस्टम संघाने उत्तरार्धात सुरुवातीपासून वेगवान चाली केल्या. उत्तरार्धाच्या पहिल्याच मिनिटाला इक्तेदार इशरत याने गोल करून मुंबई कस्टम संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी अखेरच्या टप्प्यापर्यंत कायम राखली. त्यांच्या बचाव फळीने यात मोलाची कामगिरी बजावली. सामना संपण्यास सात मिनिटे असताना कर्णधार आणि स्पर्धेचा मानकरी जयेश जाधव याने गोल करून संघाची बाजू बळकट केली.

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात इन्कमटॅक्‍स (पुणे) संघाने नितिन कुमार आणि आशिष छेत्री यांनी केलेल्या गोलच्या जोरावर मुंबई रिपब्लीकन्स संघाचा 2-0 असा पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ऑलिंपियन धनराज पिल्ले यांच्या हस्ते पार पडला. या वेळी हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष मनिष आनंद, सचिव मनोज भोरे, हुसेन नाबी स्पोर्टस फौंडेशनचे आश्रयदाते फिरोझ शेख, फौंडेशनचे उपाध्यक्ष विभाकर तेलोरे आदि उपस्थित होते.

वैयक्तिक पारितोषिके

सर्वोत्कृष्ट गोलरक्षक : यश गोंडालिया (स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ गुजरात)
बचावपटू : अजितेश रॉय (इन्कमटॅक्‍स, पुणे)
मध्यरक्षक : वेंकटेश देवकर (मुंबई रिपब्लीकन्स)
आक्रमक : तालिब शेख (हॉकी पुणे)
स्पर्धेचा मानकरी : जयेश जाधव (मुंबई कस्टम)
सर्वाधिक गोल : आकाश सपकाळ (रेल्वे पोलिस बॉईज)
सर्वोत्कृष्ट खेळाडू : आदित्य रसाळा (रोव्हर्स अकादमी अ)
सर्वोत्कृष्ट संघ : मुंबई रिपब्लीकन्स
सर्वोत्कृष्ट खेळाडू (पंचांची निवड) : इक्तेदार इशरत (मुंबई कस्टम)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)