चहा करून न दिल्याने पतीने केला पत्नीचा खून

कोल्हापूर –  पत्नीने चहा करून दिला नाही, याचा राग मनात ठेवून पतीने पत्नीचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील राजापूरवाडी इथं घडलीय. मंगल रमेश गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. तर पती रमेश गणपती गायकवाड हा स्वत: कुरूंदवाड पोलिसांत हजर झाला असून, त्याने खून केल्याची कबुली दिली आहे.

रमेश रात्रपाळीचे काम करून सकाळी साडेअकरा वाजता घरी आला होता. उपवास असल्याने फराळासाठी पत्नीला खिचडी करण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. चहा करून देण्यावरून पुन्हा भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून मंगल गायकवाड ही माहेरी जाते, असे सांगून कपड्याची पिशवी घेऊन घरातून बाहेर पडली होती.

खिद्रापूर-सैनिक टाकळी रस्त्यावरील बस थांब्याजवळ मंगल गायकवाड ही येऊन थांबली होती. रमेश हा तिला बोलविण्यासाठी थांब्याजवळ गेला असता, या ठिकाणी दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात रमेशने सोबत आणलेल्या नायलॉनच्या दोरीने गळा आवळून मंगलचा खून केला. पोलिस ठाण्यात हजर होऊन त्याने खुनाची कबुली दिली. दरम्यान, कुरूंदवाड पोलिसांनी खुनात वापरलेली दोरी, पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कपड्याची पिशवी जप्‍त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)