देणाऱ्याचे हात हजारो

चिंतन : डॉ. दिलीप गरुड

पूर्वीच्या काळी स्त्रियांच्या शिक्षणाला फार महत्त्व दिले जात नसे. “चूल आणि मूल’ एवढेच मर्यादित असे त्यांचे क्षेत्र होते. मुलगी म्हणजे परक्‍याचे धन अशी समाजात धारणा होती. त्यामुळे घरीदारी सर्वत्र तिला दुय्यम वागणूक दिली जात असे.
मात्र, पुढे काळ बदलला. देशाला स्वातंत्र्य मिळाले. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार वाढला. मुलांबरोबर मुलीही शिकू लागल्या. नोकरी करू लागल्या. त्यांचे करियर त्या घडवू लागल्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व आकार घेऊ लागले. गुणवत्ता यादीत तर त्या झळकू लागल्याच; पण विविध पदांवर आत्मविश्‍वासाने काम करू लागल्या. प्राध्यापिका, वकील, सी.ए., नगरसेविका, पायलट, आमदार, मंत्री, पंतप्रधान अशा पदांवर काम करून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले.

मुलींनी भरपूर शिकावे, त्यांच्या शिक्षणात पैशांमुळे खंड पडू नये म्हणून महाराष्ट्र पातळीवर सरकारने एक योजना काढली. त्या योजनेला सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना असे अन्वयार्थक नाव दिले. मग शाळा पातळीवर ही योजना राबविली जाऊ लागली. समाजामाधील धनिक, दानशूर व्यक्तींचा शोध सुरू झाला. ही योजना पटताच दानशूर लोक मुलींचे पालकत्व स्वीकारू लागले. काही पालक तर पाच पाच, दहा बारा मुली दत्तक घेऊन वर्षभराचा त्यांचा शैक्षणिक खर्च भागवू लागले. त्यामुळे मुलींच्या शिक्षणातील अडथळा काही प्रमाणात दूर झाला.

मी ज्या परिसरात राहतो तेथे कै. शंकुतलाबाई आनंदराव शितोळे या नावाची एक शाळा आहे. या शाळेचे मुख्याध्यापक आहेत शिवाजीराव माने. या शाळेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना. या योजनेला समाजातून मदतीचा हात मिळतो, मात्र त्यासाठी निधी गोळा करावा लागतो. त्यासाठी शिक्षकांना दानशूर पालकांचा शोध घ्यावा लागतो. त्यांना योजना पटवून द्यावी लागते. पालकांच्या सभेतही या योजनेसंबंधी माहिती पुरवून पालकांचे सहकार्य मागितले जाते.

कै. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे या विद्यालयात ही योजना 2005 सालापासून राबविली जाते. सुरुवातीला एका विद्यार्थिनीला वर्षाकाठी तीनशे रुपये दिले जात. नंतर ही रक्कम पाचशे, सहाशे अशी वाढवत वाढवत ती एक हजार रुपयांपर्यंत नेली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2017-18 या शैक्षणिक वर्षात 232 मुलींनी याचा लाभ घेतला आणि त्यासाठी शिक्षकांनी दोन लाख बत्तीस हजार रुपये मिळविले. 2018-19 या शैक्षणिक वर्षात 260 मुलींना या योजनेचा लाभ मिळाला आणि प्रत्येकीला एक हजार रुपये मिळाले. त्या पैशांतून मुली वह्या, पुस्तके, कंपास, शाळेचा युनिफॉर्म, चप्पल अशा वस्तू खरेदी करतात.

2017-18 या शैक्षणिक वर्षातील निधी वाटपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांना निमंत्रित केले होते. त्यांनी शालेय पातळीवर राबविण्यात येणारे उपक्रम समजून घेतले. आपल्या भाषणात त्यांनी या उपक्रमांचे व ते राबविणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. दत्तक पालक योजनेसाठी निधी देणाऱ्या दानशूरांचेही कौतुक केले. कार्यक्रम संपल्यानंतर चहापान झाले. पाहुणे जायला निघाले. तेव्हा शालाप्रमुख शिवाजीराव माने नम्रपणे पुढे होत पाहुण्यांना म्हणाले, “”सर, आमच्या शाळेची आर्थिक स्थिती बेताची आहे. तरीही फूल नाही पण फुलाची पाकळी म्हणून ही छोटीसी भेट स्वीकारा.”

तेव्हा श्रीपाल सबनीस सर म्हणाले, “”तुम्ही सर्व शिक्षक एवढी धडपड करून हा उपक्रम राबवताय हीच मोठी गोष्ट आहे. मला मानधनाचे ते पाकीट नको. ते पैसे मुलींच्या शिक्षणासाठीच वापरा. उलट पुढच्या वर्षापासून माझ्याकडूनच एक हजार रुपये घेत चला. मी ते अवश्‍य देईन.” सबनीस सरांचे विचार ऐकून सर्वांनाच आश्‍चर्य वाटले आणि आनंदही वाटला. याही वर्षी म्हणजे 2018-19 या शैक्षणिक वर्षात पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार या प्रमुख पाहुण्या म्हणून निधी वाटपासाठी उपस्थित होत्या. त्यांनाही हा उपक्रम खूप आवडला. त्यांनीही मानधन घेण्यास नम्रपणे नकार दिला आणि म्हणाल्या, “”तुमच्या या उपक्रमशील शाळेला मीच माझ्या संस्कृती प्रकाशनातर्फे दोनशे पुस्तके भेट देते. तुमच्या शिक्षकांनी येऊन, पुस्तके निवडून ती घेऊन जावीत.” साहित्याच्या क्षेत्रात वावरणाऱ्या या विचारवंतांकडे विचारांचे जसे वैभव असते तशी दातृत्वाचीही महनीयता असते. समाजात देणाऱ्याचे हजारो हात असतात. मात्र तो उपक्रम समाजाच्या हिताचा असला पाहिजे आणि दात्याला तो पटला पाहिजे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)